शेतकरी मित्रांनो फळे भाजीपाला निर्यातीसाठी नोंदणी करायची का ? तर इथे करा नोंदणी…

राज्यातून भाजीपाला आणि फळे पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आयातदार देशांच्या कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोग मुक्ततेबाबतची हमी देण्यासाठी आंब्यासाठी मँगोनेट प्रणालीवर १३८, द्राक्षासाठी ग्रेपनेट प्रणालीवर २८ हजार ६२४, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट प्रणालीवर १६५, केळीची आदर फ्रुटनेट प्रणालीवर २०१ अशी एकूण २९ हजार १९५ शेतांची नोंदणी झालेली आहे. राज्यात निर्यातक्षम नोंदणीत नाशिक विभाग प्रथम स्थानावर आहे.

कृषी विभागामार्फत फळ व भाजीपाला निर्यातीस चालना देण्यासाठी खास उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र
जिल्हास्तरावर स्थापन केले आहेत .निर्याती बरोबरच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना कीड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागात नाशिक ४५ हजार ०९०,जळगाव १ हजार २०० व धुळे ३५०, नंदुरबार ३५० असा एकूण ४६ हजार ९९० बागांची नोंदणीचे लक्षांक देण्यात आले आहे. तसेच फळे व भाजीपाला ऑनलाइन नोंदणीसाठी फार्म रजिस्ट्रेशनची मोबाइल ॲपचा (Mobile App) वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. द्राक्ष बागांची नोंदणी करण्यास ३१ जानेवारी २०२५ पर्यंत तर आंबा बागांची नोंदणी करण्यास ३१ मार्च, २०२५ मुदत देण्यात आली आहे. तसेच इतर फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी वर्षभर सुरू असते.

मागील वर्षीच्या तुलनेमध्ये सद्य स्थितीत शेत नोंदणी कमी झाली असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांची शेत नोंदणी संबंधित प्रणालीवर करावी, अधिक माहितीसाठी कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक, व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन विभागीय कृषी सहसंचालक वाघ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *