
kanda bajar bhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या महिन्यात भाव वाढीची दिलासादायक बातमी आहे. मागील दोन आठवड्यापासून लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या दोन महत्त्वाच्या बाजारसमित्यांसह सोलापूर येथील जास्तीत जास्त कांदा बाजारभाव २ हजार ते २५०० च्या दरम्यान आहेत.
शनिवारपर्यंत संपलेल्या आठवड्यात पिंपळगाव बसवंत येथील जास्तीत जास्त कांदा बाजारभाव २५०० पर्यंत स्थिर राहिले असून दोन्ही बाजारसमित्यांमध्ये सरासरी १५०० पर्यंत कांदा बाजारभाव पोहोचले आहेत. पुढील काळात हे कमाल दर ३ हजाराच्या आसपास जाऊ शकतात असे जाणकारांनी सांगितले आहे. त्याबद्दल विविध घटकांमधून आपण समजावून घेऊ.
राज्यातील आवक घटीचा ट्रेंड
मागच्या सोमवारपासून वाढलेली कांदा आवक शनिवार आणि रविवारपर्यंत घसरली. ही आवक क्विंटलमध्ये अशी होती.
सोमवार २ जून: ४ लाख १९ हजार क्विंटल
मंगळवार ३ जून: 2 लाख ८८ हजार क्विंटल
बुधवार ४ जून: २ लाख २८ हजार क्विंटल
गुरुवार ५ जून: २ लाख ५५ हजार क्विंटल
शुक्रवार ६ जून: १ लाख ९८ हजार क्विंटल
शनिवार ७ जून: ५८ हजार क्विंटल
देशातील कांदा आवकही घटली
देशातील आवक या आठवड्यात घटली, असे दिसून आले. दिनांक १ ते ७ जून या काळात देशात ३ लाख १५ हजार ३०० टन कांदा आवक झाली. त्यापैकी महाराष्ट्र १ लाख ४७ हजार टन, मध्यप्रदेश ५१ हजार टन, गुजरात ३५ हजार टन अशी आवक होती. त्या पूर्वीच्या म्हणजेच २५ ते ३१ मे च्या कालावधीत हीच आवक ४ लाख ३२ हजार टन इतकी होती. त्यापैकी महाराष्ट्र २ लाख २५ हजार टन, मध्यप्रदेश: ६० हजार टन, गुजरात ४२ हजार टन अशी होती. आवक घटत असल्याने त्याचाही किंमती वधारण्यावर परिणाम होऊ शकतो.
कशा असतील संभाव्य किंमती
मागच्या वर्षी म्हणजेच २०२४साली जूनच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील कांदा दर सरासरी २९०० रुपये होते, तर कमाल दर ३५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. या वर्षी नाशिकच्या किंमतीत ३८ टक्के घट पाहायला मिळत आहे. ती सरासरी ३५ टक्के घट धरली तरी यंदाच्या बाजारभावाच्या गणितानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक बाजारातील सरासरी दर १८०० ते १९०० आणि जास्तीत जास्त कांदा दर हे ३ हजारापर्यंत किंवा त्याच्या आसपास राहू शकतात असा अंदाज आहे.
(टिप: वरील कांदा बाजारभाव किंवा त्याच्या अंदाजावर हवामान, आवक, मागणी-पुरवठा, सरकारी धोरणे यांचा प्रभाव असल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवण किंवा विक्रीबाबतचा निर्णय स्वत:च्या सदसद्विवेक बुद्धीने घ्यावा. त्याला कृषी२४ जबाबदार नाही. हा मजकूर कॉपीराईटेड असून कुठल्याही पोर्टल, पेपर अथवा युट्यूब-इन्स्टा-फेसबुकवर याची कॉपी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल)