दरवर्षी आंबिया बहरासाठी त्यांची बाग साधारणत: नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान ३० ते ४० दिवस ताणावर असते.
आसाराम घुगरे यांच्याकडे १० एकर शेती असून, ते ज्वारी, गहू (Wheat), हरभरा (Chana), चारा पिके (Fodder Crop) अशी विविध पिके घेत असले तरी त्यांची ओळखही मोसंबी उत्पादक (Mosambi Producer) अशीच आहे. त्यांच्याकडे मोसंबी ५ एकर क्षेत्रावर असून, त्यातील दीड एकर बाग ही१६ बाय १६ फूट अंतरावर १९ वर्षापूर्वी लागवड (Mosambi Cultivation) केलेली आहे.
तर पाच वर्षापूर्वी १५ बाय १५ फुटावर लागवड केलेले साडेतीन एकर मोसंबी क्षेत्र आहे. जुन्या बागेत त्यांनी झाडे पाच वर्षाची झाल्यानंतर उत्पादन घेण्यास सुरुवात केली, तर नव्या बागेत झाडे तीन वर्षाची झाल्यानंतरच उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ते एकच आंबिया बहर घेतात. घुगरे यांच्याकडे सिंचनाची गरज भागविण्यासाठी त्यांच्याकडे एक विहीर व दोन बोअरवेल आहेत. त्यांचे खत आणि पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख असल्यामुळेच आजवर बागेतील एकही झाड गेले नसल्याचे छातीठोकपणे सांगतात.
ताण व पाणी व्यवस्थापन
वातावरणाच्या स्थितीचा योग्य तो अंदाज घेऊन आसाराम घुगरे मोसंबीची बाग ताणावर सोडतात. दरवर्षी आंबिया बहरासाठी त्यांची बाग साधारणत: नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान ३० ते ४० दिवस ताणावर असते.
योग्य प्रमाणात ताण बसल्यानंतर तो तोडण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यासाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते.
ताण तोडल्यानंतर बागेला ठिबकने पाणी देणे सुरू केले जाते. झाडाच्या बुंध्याच्या दोन्ही बाजूला दोन व मध्ये एक या प्रमाणे ठिबकच्या तीन लॅटरल यांचे नियोजन केले आहे. त्यातून ताण तोडताना २० लिटर प्रति झाड पाणी सोडले जाते.
त्यानंतर पाणी वाढवत नेवून नंतर ३० लिटर, ४० लिटर असे प्रति झाड १० लिटरने पाणी वाढवत नेले जाते. एप्रिल ते मे महिन्यामध्ये प्रति झाड ८० ते १०० लिटर प्रती झाड अशा प्रकारे पाणी देण्याचे घुगरे यांचे नियोजन असते.
चर पाडूनच देतात खत
साधारणत: बागेचा ताण तोडताना बागेत झाडाची कॅनोपी पाहून चर मारून शेणखत व रासायनिक खते दिली जाते. सुरुवातीला ताण तोडताना मोठ्या झाडांना प्रति झाड २ किलो व लहान झाडांना दीड किलो मिश्र खत दिले जाते.
तसेच मोठ्या झाडांना ३० किलो, तर लहान झाडांना २० ते २५ किलो शेणखत दिले जाते. त्यानंतर मे मध्ये मोठ्या झाडांना १ किलो व लहान झाडांना ५०० ग्रॅम मिश्र खते दिले जाते.
याशिवाय ताण तोडल्यानंतर बाग फुलोऱ्यात आल्यानंतर गोमूत्र, शेण, गूळ, हरभरा पीठ यांची स्लरी बनवून महिन्यातून एकदा दिली जाते. यामुळे सेंद्रिय कर्ब आणि उपयुक्त सूक्ष्मजीवाणूंचे प्रमाण वाढते. अन्य खतांचेही झाडांद्वारे चांगले शोषण होण्यास मदत होते.
तण नियंत्रण
तणनियंत्रणाचा खर्च गेल्या काही वर्षापासून वाढत चालला आहे. तो नियंत्रणात ठेवण्यासाठी गत पाच वर्षापासून पावसाळ्याची ओल असताना किंवा ओल तयार करून तणनाशकाचा वापर केला जातो.
खुरपणी वेळी किंवा ब्रश कटरच्या साहाय्याने बागेतील तणे कापून तिथेच गाडली जातात. त्याचाही बागेतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपयोग होतो.
नियोजन
-सध्या घुगरे यांच्या बागेतील फळे लिंबाच्या आकाराची आहेत.
-पंधरवड्यापासून तणाच्या नियंत्रणासाठी खुरपणी करून पाणी देणे सुरू आहे.
– पुढील महिनाभरात झाडाच्या गरजेनुसार खतांचे नियोजन केले जाईल. सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ओळखून त्या वेळीच भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. १०० झाडांना प्रत्येकी एक किलो प्रमाणे झिंक, बोरॉन व फेरस ही खते दिली जातात. तसेच १०० ग्रॅम युरिया देण्याचे त्यांचे नियोजन आहे.
-बागेतील झाडे योग्य व्यवस्थापनामुळे सशक्त असली तरी मावा, तुडतुडे याचा प्रादूर्भाव त्यांना अनेकदा जाणवला. वेळोवेळी त्यासाठी फवारणी घेतली. तसेच यंदा बुरशीचाही प्रादूर्भाव आढळल्यामुळे बुरशीनाशकाचा वापर केला.
नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात एकदा आणि मे महिन्यात एकदा अशी दोन वेळा झाडांना बोर्डोपेस्टही लावून घेतली आहे.
महत्त्वाचे…
-संपूर्ण पाणी ठिबकनेच देण्यावर भर
– झाडाच्या सर्व बाजूने ओलावा राखण्यासाठी तीन लॅटरलचा वापर केला जातो.
-महिन्यातून एकदा जीवामृत स्लरी दिली जाते.
– काढलेली तणे जागीच कुजवली जातात. त्याचा सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फायदा होतो.
source:-agrowon