कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; CM शिंदेंकडून सानुग्रह अनुदान जाहीर

राज्यातल्या संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, पण आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी कांद्याच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा सरकारला जाब विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भारताच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ४३ टक्के वाटा हा आपल्या राज्याचा आहे.”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “बाजारात लाल कांद्याची आवक जास्त आहे. देशातल्या इतर राज्यांमध्ये उत्पादन वाढलं आहे. मात्र कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळेच आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती नेमली. यामध्ये निर्णय झाल्याप्रमाणे आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देत आहोत. २०० रुपयेची शिफारस होती, पण आम्ही ३०० रुपये देत आहोत.”

source-.esakal.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *