कोल्हापूर, 29 जानेवारी : गाय, म्हैस, बैल, रेडा या सारखी जनावरं आपण नेहमी पाहतो. त्यामधील काही जनावरं आपल्या काम करण्याच्या तर काही शेतकऱ्यांना दुधामुळे उत्पादन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर काही जनावरं हे त्याच्या किंमतीसाठी ओळखली जातात. कोल्हपूरकरांना सध्या तब्बल 12 कोटीच्या रेड्याची भूरळ पडली आहे. या धष्टपुष्ट रेड्याला पाहून प्रत्येक जण अचंबित होत आहेत. कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने हा रेडा आला होता.
काय आहे खासियत?
मुऱ्हा जातीच्या या रेड्याचे नाव बादशाह आहे. हरियाणा येथील प्रदीपसिंग चौधरी यांच्या मालकीचा हा रेडा आहे. प्रदीप हे भिवाणी जिल्ह्यातील दुर्जनपुर गावचे रहिवासी आहेत. ते दुर्जनपूर गावचे सरपंच आहेत. त्यांच्या घरी 25 जनावरांचा मोठा गोठा आहे. ज्यामध्ये अनेक रेडे आणि म्हशी आहेत. प्रदीप यांचे वडील कुवरसिंग आणि आई इंद्रावती या जनावरांची देखभाल करतात. प्रदिपच्या वडिलांना जनावरं पालनाची आवड होती. या जनावरांसाठी त्यांनी विशेष गोठ्याची देखील सोय केली आहे.
बादशाह रेडा हा तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविणारा जगातील सर्वात मोठा रेडा आहे. त्याची उंची 6 फूट आहे. बादशहा हा 4 वर्षाचा असून त्याचे वजन 1100 किलो आहे.
कशी ठरली 12 कोटी किंमत ?
प्रदीप यांचा हा बादशाह रेडा सगळीकडे आपला नावलौकीक कमवत आहे. या रेड्याची 12 कोटी इतकी किंमत त्याच्या वीर्यामुळे ठरवली जाते. त्याच्या सरकारी नियमानुसार दहा वर्षात या रेड्याकडून 12 कोटी रुपयांपर्यंतची वीर्य विक्री होऊ शकते. यावरूनच याची किंमत ठरल्याचे मालक प्रदीप यांनी स्पष्ट केले.
काय असते या रेड्याचे खाद्य ?
बादशाह रेड्याला कॉटन सीड, चना, गव्हाचा कोंडा, दूध, हिरवा चारा, बाजरी, मका, ड्रायफ्रूट्स त्याच बरोबर मोसमी फळे असे खाद्य दिले जाते. त्याची तब्येत तंदरुस्त राहावी यासाठी त्याला रोज एक कॅल्शियमची बॉटल देखील देण्यात येते.
कसा आहे बाहशहा रेड्याचा दिनक्रम?
या रेड्याचा दिनक्रम पहाटे चार वाजता सुरू होतो. पहाटे त्याला खाद्य दिले जाते. त्यानंतर त्याला अंघोळ घातली जाते. तर आंघोळीनंतर त्याची कधी तेलाने, कधी बॉडी लोशन लावून याची मालिश केली जाते. रोज पाच किलोमीटर त्याला फिरवले जाते. त्याचबरोबर दर महिन्याला याच्या अंगावरचे केस काढले जातात, असे देखील प्रदीप यांनी सांगितले.
बादशाह रेड्याचीच बिजली नावाची बहीण असणारी म्हैस आहे. तिने तीन वेळा तब्बल 31 लिटर दूध देण्याचा विक्रम केला आहे. ही म्हैस 5 वर्षांची आहे. या दोन्ही जनावरांचे आई-वडील जनावरे देखील अजूनही जिवंत आहेत. वडील बजरंगी हा रेडा आठ वर्षाचा असून आई लीलावती ही म्हैस सात वर्षांची आहे.
फळबाग लागवडीसाठी घ्या सरकारी योजनेचा फायदा, लगेच भरा अर्ज
प्रदिपसिंग चौधरी, संदीप, अनिल, कैलाश, डॉ. श्रीक्रिष्णन, दिपेंदर, लोकेश, राज, कप्तान सिंग असे सगळे जण मिळून त्यांच्या जनावरांचे पालन पोषण संगोपन करतात. कुठेही बाहेर प्रदर्शनात जाताना सर्वजण एकत्र जातात त्याचबरोबर सोबतीला प्राणी देखील असतात, असं प्रदीप यांनी सांगितले.
Source:- Lokmat