राजस्थानातल्या शेतकरी बंधूंची यशोगाथा; पाहा झेंडूच्या शेतीतून कशी होते लाखो रुपयांची कमाई?

झेंडूच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई
एका शेतातून 2 दिवसांत 100 किलो फुलांचं उत्पादन मिळतं. स्थानिक व्यापारी शेतातूनच 20-30 रुपये किलो अशा दराने फुलं घेऊन जातात. त्यामुळे पटेल कुटुंबाला वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं.

पारंपरिक शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढते आहे. शेतीमधूनही लाखो रुपये कमावता येऊ शकतात, हे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे. फूलशेती हा असाच एक प्रयोग आहे. भारतासारख्या उत्सवप्रिय देशामध्ये फुलांना सततच मागणी असते. त्यामुळे फुलांच्या शेतीमधून चांगले पैसे कमावता येऊ शकतात. देशातल्या काही शेतकऱ्यांनी फूलशेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावले आहेत. राजस्थानातली डुंगरपूरमधल्या शेतकरी बंधूंची यशोगाथा प्रेरक आहे. ते झेंडूच्या फुलांची शेती करून वर्षाला 6-7 लाख रुपये कमावतात.

फुलांची शेती केली आणि…

पारंपरिक शेतीतून मिळणारं उत्पन्न तोकडं असल्यानं डुंगरपूरच्या या शेतकऱ्यांनी त्याला नवा पर्याय शोधलाय. नफा मिळवून देणाऱ्या पिकांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय. डुंगरपूरच्या सुरपूर ग्रामपंचायतीतल्या धुवाडिया गावात झेंडूची शेती करून लाखो रुपये कमावणारे तीन शेतकरी बंधू राहतात. कोदर पटेल, कचरू पटेल आणि तेजपाल पटेल हे तिघंही झेंडूच्या शेतीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. हे तिघंही आधी पारंपरिक शेती करायचे. गहू, तांदूळ, मका ही पिकं ते घ्यायचे; मात्र हळूहळू उत्पादन कमी होत गेलं. कष्टाच्या तुलनेत नफा मिळणं कमी झालं. त्यामुळे शेतीबद्दल त्यांना अनास्था वाटू लागली. तरीही त्यांनी शेतीवर लक्ष कायम ठेवलं. ते तिघंही यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागले. काही तरी वेगळं केलं पाहिजे असं त्या तिघांनाही वाटत होतं. मग त्यांनी वेगळं पीक घ्यायचं निश्चित केलं. त्याच वेळी फुलांची शेती करावी असा विचार त्यांच्या डोक्यात आला. कुटुंबीयांनीही त्यांच्या या विचाराला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांनी फुलांची शेती करायला सुरुवात केली व आज त्यातून चांगला नफा कमावत आहेत.

किती मिळतं उत्पन्न?

तिन्ही भाऊ ऋतुमानाप्रमाणे फुलांची शेती करतात. त्यांच्याकडे असलेल्या अंदाजे 3 एकर जमिनीत त्यांनी 3 शेतं केली आहेत. एका शेतातून 2 दिवसांत 100 किलो फुलांचं उत्पादन मिळतं. स्थानिक व्यापारी शेतातूनच 20-30 रुपये किलो अशा दराने फुलं घेऊन जातात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. झेंडूच्या फुलांची मागणी आपल्याकडे शक्यतो दसरा-दिवाळीच्या सुमारास असते; मात्र एरव्हीही झेंडूची फुलं सजावट व इतर उत्सवांसाठी लागतात. त्यामुळेच या फुलांना मागणीही बऱ्यापैकी असते. झेंडूच्या शेतीतून शेतकरी चांगला पैसा कमावू शकतात. म्हणूनच शेतकरी नफा देणारी अशा प्रकारची शेती करू लागले आहेत.

Source:- lokmat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *