जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३ अंतर्गत ई-पीकपाहणी मोहिमेअंतर्गत पिकांना पेरा नोंदविण्याचे काम सुरू आहे. यासाठी ३१ जानेवारी अंतिम मुदत होती.
नांदेड : रब्बी हंगामात (Rabi sowing) शेतकऱ्यांच्या स्तरावर करण्यात येणाऱ्या पीकपेरा नोंदणीसाठी (Crop Sowing Registration) पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी (E Peek Pahani) मोहिमेअंतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत पीकपेरा नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३ ई-पीकपाहणी मोहिमेअंतर्गत पिकांना पेरा नोंदविण्याचे काम सुरू आहे. यासाठी ३१ जानेवारी अंतिम मुदत होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेवटच्या वेळी पेरा नोंदविण्यासाठी धावपळ झाली होती.
पेरा नोंदविण्याचे शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी मुदत वाढविण्याची मागणीही केली होती. तसेच प्रशासकीय पातळीवरही मुदतवाढीबाबत अनुकूलता दर्शविण्यात आली होती.
दरम्यान, यंदा मॉन्सून उशिरापर्यंत लांबल्यामुळे रब्बी हंगामाची उशिराने पीकपेरणी झाली. तसेच जिल्हा पातळीवरून क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी रब्बी हंगाम मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती.
यामुळे रब्बी हंगाम २०२३ मोबाईल ॲपद्वारे ई-पीकपाहणीकरिता १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
हमीदरानुसार हरभरा विक्रीसाठी पेरा अनिवार्य
शेतकऱ्यांना किमान हमीदरानुसार हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन पीकपेरा नोंदणी आवश्यक आहे. अनेक वेळा शेतकरी कामाच्या व्यवस्थतेमुळे याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, हरभरा विक्रीसाठी अडचणी येतात.
जिल्ह्यात रब्बीमध्ये हरभरा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असल्यामुळे अनेक शेतकरी पेरा नोंदणीपासून वंचित होते. दरम्यान, पेरा नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाल्याने हरभरा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
Source :- Agrowon