पोर्टलवरील अर्जातून कृषी आयुक्तालय स्तरावर सोडत पद्धतीने लाभार्थींची निवड केली जाते.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या चार कृषी यांत्रिकीकरण योजनांतर्गत २०२२-२३ या वर्षात गुरुवार (ता. २) पर्यंत विविध प्रकारची अवजारे खरेदी केलेल्या परभणी जिल्ह्यातील २ हजार ३५५ लाभार्थींना १२ कोटी ५३ लाख ३ हजार २६२ रुपये एवढे अनुदान निधी वितरित करण्यात आले अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना यांत्रिकीकरण या चार योजनांतर्गत महाडीबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया विना मुदत सुरू असते.
पोर्टलवरील अर्जातून कृषी आयुक्तालय स्तरावर सोडत पद्धतीने लाभार्थींची निवड केली जाते. पूर्वसंमतीनंतर अवजारे खरेदी करून देयके अपलोड केल्यानंतर पडताळणी केली जाते. त्यानंतर संबंधित लाभार्थांना अनुदान वितरित करण्यात येते.
चालू आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्यातील ट्रॅक्टर खरेदी केलेल्या ३३६ शेतकऱ्यांना ३ कोटी ९९ लाख २५ हजार रुपये तर ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारांच्या खरेदीबद्दल १ हजार ७३४ शेतकऱ्यांना ७ कोटी ४१ लाख १२ हजार ७७६ रुपये अनुदान वितरित करण्यात आले.
पशुचलित अवजारे खरेदी केलेल्या ९२ शेतकऱ्यांना ५ लाख २७ हजार ७६७ रुपये, हस्तचलित अवजारे खरेदीनंतर ५० शेतकऱ्यांना २ लाख ४४ हजार १९४ रुपये, पॉवर टिलर खरेदी केलेल्या २७ शेतकऱ्यांना २० लाख १७ हजार ७४८ रुपये, प्रक्रिया संयंत्र खरेदीनंतर १० शेतकऱ्यांना १२ लाख ४० हजार ३०० रुपये, स्वयंचलित यंत्रे खरेदी केलेल्या १०६ शेतकऱ्यांना ७२ लाख ३५ हजार ४७७ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी डॉ. संदीप जगताप यांनी सांगितले.
source-agrowon