राज्यात कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे
राज्यात कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. ३१) विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा (Rain Prediction) देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. तसेच राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Update) वर्तविली आहे.
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडाही वाढला आहे. गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सोलापूर, अकोला, अमरावती येथे ३९ अंशांपेक्षा अधिक, तर जळगाव, परभणी, ब्रह्मपूरी, नागपूर, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ येथे कमाल तापमान ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली असून, बहुतांश ठिकाणी पारा १५ ते २६ अंशांच्या दरम्यान आहे.
छत्तीसगडपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत.
पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशा पर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. ३१) विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता असून, राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३५.७ (१४.७), नगर ३७.३ (-), जळगाव ३८.३ (१९.५), धुळे ३७.० (१४.५), कोल्हापूर ३६.० (१७.२), महाबळेश्वर २९.९ (१५.६),
नाशिक ३४.२ (१६.३), निफाड ३५.५(१२.१), सांगली ३५.४ (१६.४), सातारा ३५.८ (१३.५), सोलापूर ३९.४(२१.०), सांताक्रूझ ३०.८ (२३.०), डहाणू ३१.९ (२१.०), रत्नागिरी ३२.१ (२०.९),
छत्रपती संभाजीनगर ३६.३ (१८.८), नांदेड – (२३.४), परभणी ३८.९ (२१.६), अकोला ३९.४ (२२.६), अमरावती ३९.२(२१.३), बुलढाणा ३७.८ (२२.२), ब्रह्मपूरी ३८.२ (२५.३), चंद्रपूर ३८.८ (२४.४),
गडचिरोली ३५.४(२०.२), गोंदिया ३७.० (२४.०), नागपूर ३८.४ (२३.३), वर्धा ३९.५(२३.४), वाशीम ३८.८ (२०.४), यवतमाळ ३८.५ (२२.५).
शुक्रवारी (ता.३१) राज्यातील वादळी पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
source:- agrowon