जिद्द, मेहनत, गुणवत्तेचा आग्रह यातून शिर (जि. रत्नागिरी) येथील स्नेह आणि अनिल या मोरे दांपत्याने काजू प्रक्रिया उद्योगात शून्यातून नाव कमावले आहे.
Food Processing Industry : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. याच तालुक्यातील शिर येथे स्नेहा आणि अनिल या मोरे दांपत्याचा काजू प्रक्रिया उद्योग विस्तारला आहे. (Cashew processing industry in Ratnagiri)
हे दांपत्य २०१२ च्या पूर्वी मुंबई येथे नातेवाइकांकडे राहायचे. स्नेहा ‘थ्री स्टार’ हॉटेलमध्ये मदतनीस तर अनिल हे हिरे उद्योगात नोकरीस होते. एकदा हॉटेलमध्ये कणकवली भागातील मोठ्या प्रमाणातील काजूगर स्नेहा यांच्या दृष्टीस पडला.
कोकणातील काजू उद्योगाची क्षमता व संधी त्यांच्या लक्षात आली. दांपत्याने अधिक अभ्यास करून काजू प्रक्रियेत उतरण्याचे नक्की केले. अनिल यांचे गाव शिर हेच असल्याने तेथेच २७ गुंठे जमीन घेत व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.
प्रक्रिया उद्योगास सुरवात
भांडवल हा मुख्य प्रश्न होता. कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून कोकण पॅकेज अंतर्गत २०११ मध्ये व्यवसायासाठी प्रस्ताव सादर केला. स्टेट बँकेमधून एक लाख रुपये मिळाले. त्यातून ४० किलो क्षमतेचा बॉयलर, २५ किलो क्षमतेचा ड्रायर, हॅण्डकटर, पॅकिंगसाठीचे यंत्र आदींची खरेदी झाली.
वीसहजार रुपयांत शेड उभारले. उद्योगाला दिशा देताना वर्षभरात एक टन प्रक्रिया करण्यापर्यंत मजल गाठली. पुरेसे भांडवल नसल्याने बी विकत घेऊन साठवून ठेवणे शक्य नव्हते. सन २०१४ मध्ये बॅक ऑफ इंडियाकडून सव्वा लाख रुपये कर्ज घेतले. पुढे सहा टन प्रक्रियेपर्यंत क्षमता पोचली.
बोलीवर काजू बी खरेदी
परिसरातील काजू उत्पादकांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून उधारीवर बी घेण्यास सुरवात केली. प्रक्रिया करून विक्रीतून येणाऱ्या पैशांतून उधारी फेडण्यास सुरवात केली. बाजारपेठेतील काजूबी चा दर कमी- जास्त होत असला तरी शेतकऱ्यांसोबत ठरावीक दर निश्चित केला जातो.
त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत नाही. बाजारपेठेनुसार सरासरी ११० ते १२० रुपये प्रति किलोने बी खरेदी केली जाते.
उद्योगक्षमतेत वाढ
छोट्या ‘मशिनरी’ मुळे एकावेळी जास्तीत जास्त १०० किलो काजू बी वर प्रक्रिया व्हायची. त्यामुळे मागणी असली तरीही पुरवठा करणे शक्य नव्हते. मग सातारा- मुर्तावडे येथील शेतकऱ्याच्या मदतीने ‘मशिनरी’साठी १५ लाख रुपयांची तरतूद झाली. नाशिक येथून नवी यंत्रणा खरेदी केली.
बॉयलिंग, कटिंग, ड्राईंग, व पिलींग या चार दिवसांच्या प्रक्रिया बॅचमध्ये एक टन प्रक्रिया करणे शक्य झाले. प्रकल्पाची एकूण क्षमता आजमितीला वार्षिक ७० टनांपर्यंत पोचली आहे.
अशी होते काजू बीवर प्रक्रिया
१) काजू बी प्रक्रियेसाठी घेण्यापूर्वी चार दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतली जाते. जेणेकरून फोडताना कोणती अडचण येत नाही.
२) शंभर अंश सेल्सिअसला बी वाफवली जाते.
३) आठ तासानंतर प्रति तासाला २० किलो बीचे ‘कटिंग. ८० टक्के गर पूर्ण. दहा टक्के माल कटिंगविना तर उर्वरित १० टक्के तुकडा.
४) त्यानंतर यांत्रिक व मनुष्याकरवी प्रतवारी होते.
५) पुढे ड्राईंग व ‘पिलींग’ होते.
६) डाग असलेले काजूगर बाजूला काढून ग्रेडिंगनुसार पॅकिंग होते.
प्रतवारी, मिळवलेले ‘मार्केट’
१) डब्ल्यू १८०, डब्ल्यू २१०, डब्ल्यू २४०, डब्ल्यू ३२०, डब्ल्यू ४०० अशा पाच ग्रेडसमध्ये प्रतवारी.
२) १०० ग्रॅम ते १० किलो पॅकिंगद्वारे ६५० ते १०३० रुपये प्रति किलो दराने विक्री.
३) सुरवातीला मुंबईहून केवळ स्नेहाच गावी परतून त्यांनी उद्योग सांभाळला. अनिल काही काळ मुंबईतच होते. त्याकाळात त्यांनी तेथील दुकाने, मॉल, व्यापारी, स्थानिक ग्राहकांची बाजारपेठ मिळवली.
४) दांपत्याने मुंबईतील प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. चिपळूण येथील कृषी धान्य महोत्सवात तीन दिवसात ५६ हजार रुपयांच्या काजुगराची विक्री.
५) मागील वर्षी मंत्रालयात एक लाख रुपयांपर्यंतची विक्री.
६) आज पुणे, मुंबई, पनवेल आदी ठिकाणी बाजारपेठ. वार्षिक ७० टन प्रक्रिया झालेला सर्व काजू विकला जातो.
मसाला काजुगरांनाही मागणी
१) बाजारपेठेतील मागणी ओळखून मसाला, खारा व काळीमिरी काजू निर्मिती. त्याची वर्षाला दोन टनांपर्यंत विक्री.
२) स्नेहा यांनी चंडिका महिला बचत गटाची स्थापनाही केली आहे. त्यामाध्यमातून आंबा पल्प निर्मितीही सुरू केली आहे.
३) कोल्हापूर ,केरळ, हरियाना, दिल्ली बाजारपेठा मिळविण्यास सुरवात.
प्रशिक्षणामुळे आली सुसूत्रता
मुंबईत बचत गटांसाठी आयोजित प्रशिक्षणात स्नेहा यांना मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आकर्षक पॅकिंग व लेबल लावून विक्रीचा फायदा मिळाला. ग्राहकांचे दूरध्वनी क्रमांक नोंदवून त्यांच्याशी संवाद साधून ‘फीडबॅक’ घेतला. त्यातून ग्राहक कायमचे जोडले गेले.
कोरोना कालावधीत त्याचा फायदा झाला. अजित विचारे यांच्यामार्फंत शेतकऱ्यांच्या व्हॉटस ॲप ग्रूपवर मोरे यांच्या उद्योगाची माहिती ‘शेअर’ झाली. त्यातून राजापूर, कणकवली येथील शेतकरी काजू बी देऊ लागले.
बाजार समितीच्या काजू बी तारण योजनेचाही लाभ मिळत आहे. पंतप्रधान अन्न व प्रक्रिया उद्योग योजनेतून एक कोटीचा प्रस्ताव गुहागर कृषी विभागाकडे सादर केला आहे.
प्रकल्पाची क्षमता शंभर टनांपर्यंत नेण्यासाठी अत्याधुनिक ‘मशिनरी’ विकत घेण्याचा प्रयत्न आहे. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर आंबवकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.
Source:- Agrowon