वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघात होतो. म्हशी, संकरीत गाई यांना हा आजार जास्त प्रमाणात होतो. उष्माघातामुळे जनावरांची उत्पादकता कमी होते, बऱ्याचदा हा आजार प्राणघातक होऊ शकतो.
उष्माघाताची कारणे
- गोठ्याच्या परिसरातील तापमानात प्रचंड वाढ हे प्रमुख कारण आहे.
- वातावरणात भरपूर आर्द्रता असणे.
- जनावरे बांधण्याचा गोठा कोंदट असणे.
- उन्हाच्या वेळेत जनावरे चारावयास सोडणे.
- जनावरांची लांबवर वाहतूक.
- पिण्याच्या पाण्याची कमरता.
- दिवसा सावलीची सोय नसणे.
- जास्त वयस्क व कमी वयाच्या जनावरांत उष्णता सहन करण्याची क्षमता कमी असते. अशी जनावरे उन्हाळ्यात उष्माघातास जास्त बळी पडतात.
- लठ्ठ जनावरे, अंगावर भरपूर केस किंवा लोकर असणाऱ्या जनावरांना उष्माघाताचा जास्त त्रास होतो.
लक्षणे
- शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंश फॅरनहाईटपर्यंत वाढते.
- श्वसनाचा वेग वाढतो.
- हृदयाचे ठोके वाढतात.
- जनावर जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करते.
- जनावर लाळ गाळते.
- नाकातून स्राव येतो.
- जनावरास भरपूर तहान लागते.
- जनावर अस्वस्थ होते.
- जनावरांना शरीराचा तोल सांभाळता येत नाही.
- जनावर चालताना अडखळते व कोसळते.
- जनावराला झटके येतात.
- जनावर बेशुद्ध पडून दगावते.
उपचार
- जनावरांचा गोठा हवेशीर असावा.
- जनावरांना हवेशीर ठिकाणी बांधावे किवा पंख्याची व्यवस्था करावी, जेणेकरून हवा खेळती राहील.
- जनावराचे अंग थंड पाण्याने ओले करावे, जेणेकरून शरीराचे तापमान कमी होईल.
- जनावरास पिण्यासाठी भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे. चघळण्यास बर्फ द्यावा.
- जनावराच्या डोक्यावर बर्फाने शेकावे.
- पशुवैद्यकाच्या सल्ल्याने थंड ग्लुकोज सलाईन, तापनाशक औषधे द्यावीत.
- आजारी जनावरास सावलीत बांधावे, उन्हात अजिबात नेऊ नये.
प्रतिबंध
- उन्हाच्या वेळेत जनावरे चरावयास सोडू नयेत.
- उन्हाच्या वेळी जनावरांची लांब वाहतूक करू नये. जनावरांची वाहतूक सकाळी किंवा सायंकाळी करावी.
- जनावराला पिण्यासाठी भरपूर पाणी द्यावे.
- जनावरास बांधण्यास सावलीची सोय करावी.
- अंगावर भरपूर केस, लोकर असणाऱ्या जनावरांच्या अंगावरील केस काढून टाकावेत.
source:- agrowon