महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठ्याप्रमाणावर नुकसान केलं आहे. शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं आहे, त्यामुळे बळीराजा पुढच्या मोसमाकडे डोळे लावून बसला आहे. त्यातच आता हवामान खात्याने यंदाच्या वर्षीच्या मान्सून बाबत अंदाज व्यक्त केला आहे, पण स्कायमेट आणि भारतीय हवामान खातं म्हणजेच आयएमडी यांच्या अंदाजामध्ये तफावत आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या मान्सून अंदाजाची प्रतीक्षा असते. सगळे शेतकरी हवामान विभागाचा नेमका काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज सोमवारी स्कायमेटनं वर्तवला होता. आता भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत अंदाज वर्तवलाय.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केलाय. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलीय. जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहणार आहे. मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव राहणार असून त्याचा परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धात दिसेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.
अल निनोच्या धोक्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडेल असा प्राथमिक अंदाज स्कायमेटनं सोमवारी वर्तवला होता. जून ते सप्टेंबर काळातील मान्सून नेहमीपेक्षा 6 टक्के कमी पडणार असून हे प्रमाण 94 टक्के राहिल असं स्कायमेटनं सांगितलंय. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला हा पहिला दीर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
source:- lokmat