करनूर ,तालुका कागल ,जिल्हा कोल्हापूर येथील सतीश सागावकर यांनी ऊस आणि त्यामध्ये सुमारे पाच अंतर पिके हा पॅटर्न दहा वर्षापासून कायम ठेवला आहे . मजूर समस्या लक्षात घेऊन त्यानुसार आंतर पिकाची निवड करीत ऊसातील उत्पादन खर्च 40 ते 50 टक्के कमी केला आहे. शिवाय आंतरपीकाच्या फायदा घेत जमिनीचा पोत टिकवला आहे.
कोल्हापूर बंगळूर महामार्ग जवळ कोगलनोळी टोल नाक्याजवळ करनूर, तालुका कागल ,जिल्हा कोल्हापूर हे गाव आहे . तिथे प्रामुख्याने उसाचे उत्पादन घेतले जाते. सतीश सिताराम सागावकर यांची नऊ एकर शेती असून काळवट व माळभाग मध्यम अशा तीन प्रकारची जमीन आहे. त्यापैकी सुमारे सहा एकर क्षेत्रामध्ये उसाची लागवड केली जाते . तीन एकर लागवडीचा ऊस तर तीन एकरात त्याचा खोडवा असतो.
उसातील अंतर पिके ‘पॅटर्न’
सतीश दरवर्षी आडसाली उसाची लागवड करतात पावसाची स्थिती लक्षात घेऊन जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये साडेचार फुटी सोडून शेत लागवडीसाठी तयार केले जाते. जूनच्या महिन्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भुईमूग मिरची इत्यादीची लागवड बोदावर केली जाते . ऑगस्टमध्ये उसाची लागवड होते तोपर्यंत आंतर पिकाची वाढ सुरू झालेली असते. मिरची मधल्या तीन फूट जागेत कमी कालावधीतील पालेभाज्या उदाहरणार्थ कोथिंबीर, पालक व जोडीला काही प्रमाणात झेंडूही घेतला जातो. आंतर पिकाच्या लागवडीपूर्वी मिरची आणि भुईमुगासाठी सिंगल सुपर फॉस्फेट, 10 26 26 अधिक खतांचा वापर होतो . तर ऊस लागवडीवेळी डीएपी, पोटॅश ,युरिया आदींचा प्रत्येकी एकरी 70 किलो याप्रमाणे वापर होतो. उसाचे को ८६०३२ हे वाण असते.
भुईमुगाची सुमारे साडेतीन महिन्यांमध्ये काढणी होते. तर मिरची देखील लागवडीनंतर साडेपाच महिन्यापर्यंत पूर्ण होते. म्हणजेच एकूण साडेपाच ते सहा महिन्याच्या आत सर्व आंतरपिके निघून जातात. त्यानंतर केवळ उसाची वाढ सुरू होते पूर्वी सतीश वेलवर्गीय पिके घ्यायचे मात्र त्यात मजूर संख्या जास्त लागायची त्या तुलनेमध्ये कमी मंजूर बळ असलेल्या काही पिकांची निवड त्यांनी केली. कागल येथे दर सोमवार व गुरुवारी बाजारात भाजीपाल्यांची विक्री होते . काही वेळा मार्केट पाहून ओल्या भुईमूग शेंगा ही विक्री तिथे होते.
खोडव्यात उन्हाळी सोयाबीन..
उसाच्या खोडव्यातही उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग सतीश हे दहा वर्षापासून करीत आहेत . ऊस तुटल्यानंतर पाचट बारीक करून ते एकसारखे पसरवले जाते एकाड एक सरित सोयाबीन असल्याने त्यानुसार हे नियोजन होते. दरवर्षी या सोयाबीनचे सहा ते सात क्विंटल उत्पादन घेण्यात यशस्वी झाले आहेत. खरिपातही जागेचे उपलब्धतेनुसार उसात आंतरपीक म्हणून बोदावर सोयाबीन घेतात त्याचे एकरी नऊ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते.
आंतर पिकामुळे होतात हे फायदे..
उसाचे एकरी उत्पादन खर्च किमान 80 ते 90 हजार रुपये असतो, आंतर पिकातील उत्पादनामुळे त्यातील 40 ते 50 टक्के खर्च वसूल होतो . उसाची निव्वळ नफ्यात वाढ होते.
उसाची मोठी भरणी होण्याच्या अगोदरच आंतरपीक काढले जाते. त्याच्या विक्रीतून मिळणारी रक्कम उसाच्या पुढील व्यवस्थापनासाठी उपयोगी येते.
काही किडी आंतर पिकाकडे आकर्षित होतात. त्यामुळे ऊस हा सुरक्षित राहतो.
सोयाबीन सारखे द्विदल पीक जमिनीत नत्र स्थिर करण्यासाठी उपयोगी ठरते.
मिरची सारख्या पिकाचा बेवड म्हणून चांगला फायदा होतो.
आंतर पिकाची अवशेष जमिनीला नैसर्गिक खत म्हणून उपयोगाला येतात. त्यातून जमिनीचा पोत टिकणे शक्य होते
शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी…
आंतरपीक घेत असल्याने उसात तणनाशकाचा वापर करता येत नाही. त्यामुळे फक्त खुरपणी (भांगलण) हाच पर्याय असतो. त्यामुळे मातीचे तन नाशक पासून संरक्षण होते.
सतीश यांच्या घरी घरचा ट्रॅक्टर असल्या मुळे स्वतः मशागत करतात . त्याचा खर्च वाचतो . प्रत्येकी दोन म्हशी व गाई असल्याने शेणखत देखील घरी तयार होते. शेतीचे व्यवस्थापन सोपे व्हावे त्यामुळे शेतातच त्यांनी घर बांधले आहे. सतत एकावर एक अशी पिके न घेता जमिनीला विश्रांतीही दिली जाते . खोडवा उसात लेंडी खत किंवा एकरी सहा ते सात ट्रॉली शेणखत पसरवले जाते किंवा पंधरा दिवस बकरी शेतात बसवली जाते.
पूर्वी उसाची एकरी उत्पादन 30 टनापर्यंत होते . मात्र आंतरपीक , जमिनीला विश्रांती, जमिनीचा पोत टिकवणे व व्यवस्थापन इत्यादी गोष्टींमधून एकरी उत्पादन आता 70 टनापर्यंत तर खोडव्याचे 55 ते 60 टन पर्यंत ते घेत आहेत.