पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करण्यासाठी कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभागांमध्ये करार झाला असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दापोली येथे दिली.
दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री केसरकर यांनी पत्रकारांशी रविवारी संवाद साधला. शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासनाकडून पावले उचलली जात आहे.
पर्यावरण संतुलन बिघडण्याचे परिणाम वातावरणावर होत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत . त्याचाच एक भाग म्हणून मुलांमध्ये जागृती करण्यासाठी सकारात्मक पावले शिक्षण विभागाकडून उचलली जात असल्याची ही माहिती केसरकर यांनी सांगितले.
पहिलीपासून कृषी अभ्यासक्रम सुरू केला तर जनजागृती होईल. चालू शैक्षणिक वर्षात याची सुरुवात करण्यात येणार आहे . याबाबत मंत्री केसरकर म्हणाले, की मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण होण्यासाठी पहिलीपासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
पर्यावरणाचे संतुलन बिघडले असल्याचे आपण फक्त बोलत राहतो. त्यात बदल करण्यासाठी आपल्याला निसर्गाशी नाते जोडायला पाहिजे. त्यासाठी कृषी शिवाय पर्याय नाही . त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शेतीकडे वळा,असा संदेशही दिला जाणार आहे . कृषी विभागाने शालेय शिक्षण विभाग यांच्यामध्ये करार झाला आहे. त्याची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे.
शिक्षकांना कृषी प्रशिक्षण देणार..
राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाशी सामस्य करार केला जाणार आहे . त्या त्या कृषी विद्यापीठाकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. असे मंत्री केसरकर म्हणाले.












