![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/सरकार-देणार-स्वस्त-डाळ-आणि-पिठानंतर-कमी-दराने-भारत-तांदूळ-.webp)
सर्वसामान्यांना स्वस्त दरामध्ये धान्य खरेदी करता यावे यासाठी केंद्र सरकारकडून ‘भारत’ ब्रँडच्या नावाने स्वस्त डाळ आणि स्वस्त पीठ विक्री सुरु आहे. आता सरकार स्वस्त डाळ आणि पिठानंतर तांदूळही कमी किंमतींत विकणार आहे.सरकारने सर्वसामान्यांसाठी ‘भारत तांदूळ’ आणला आहे. या भारत तांदळाची विक्रीही 6 फेब्रुवारी 2024 म्हणजेच पुढील मंगळवारपासून सुरू होत आहे. 29 रुपये प्रति किलो इतकी भारत तांदळाची किंमत असेल. हा तांदूळ तुम्हाला कसा आणि कुठून खरेदी करता येईल, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया ..
कमी दरात पिठ आणि डाळीनंतर आता कमी दरात तांदूळ विक्री ..
तांदूळ, डाळी आणि पिठाच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत आहे. गहू, पीठ आणि स्वस्त तांदळाच्या निर्यातीवर सरकारने निर्बंध लादल्यापासून तांदूळ, डाळी आणि पीठ महागले आहे. सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी भारत ब्रँड आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारत ब्रँड अंतर्गत केंद्र सरकार ‘भारत तांदूळ’ बाजारात आणणार आहे. भारत तांदळाची पुढील आठवड्यापासून विक्री सरु होईल. हा स्वस्त तांदूळ 29 रुपये किलो दराने 6 फेब्रुवारीपासून विकला जाणार आहे. तसेच, शुक्रवारी व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील साठा जाहीर करण्याच्या सरकारने सूचना दिल्या होत्या , ज्यामुळे भाव नियंत्रणात ठेवता येतील.
भारत तांदूळ कुठे मिळेल?
गेल्या एका वर्षामध्ये सुमारे 15 टक्क्यांनी तांदळाच्या किरकोळ आणि घाऊक किमतीत वाढ झाली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली .सरकारने निर्यातबंदी करून देखील तांदळाच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे तांदळाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने भारत तांदूळ बाजारात आणला आहे. भारत तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने नाफेड आणि एनसीसीएफ सहकारी संस्थांमार्फत बाजारात विकला जाईल. याशिवाय भारत तांदूळ केंद्र भंडारच्या रिटेल चेनवरही विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही विक्री..
केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले की, भारत तांदूळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही विक्री केली जाईल . पुढील आठवड्यापासून भारत तांदूळ 5 आणि 10 किलोच्या पॅकिंगमध्ये लोकांना उपलब्ध करून दिला जाईल . पहिल्या टप्प्यात किरकोळ बाजारात सरकारने 5 लाख टन तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. महागाई आटोक्यात येईपर्यंत निर्यातबंदी संपवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे. तांदूळ निर्यातीवरील बंदी तूर्तास कायम राहणार आहे.