या लेखामध्ये आपण सोनालीताई यांची यशोगाथा पाहणार आहोत . सोनाली ताईंचे माहेर नारोडी- लांडेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) आहे. सोनालीताईना तीन बहिणी व एक भाऊ आहे. सोनाली या अवसरी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये संगणक अभियंता विषयात शिक्षण घेत असतानाच, त्यांचा विवाह वारुळवाडी (नारायणगाव) येथील नितीन पारधी यांच्याशी झाला.
विवाह नंतर सोनाली ताई या पती नितीनसह शेत मजुरीवर जाऊ लागल्या. शेतीतील मजुरी कामे करत असतानाच परिसरातील शेतकरी सतीश बनकर यांची 27 एकर शेतीचे व्यवस्थापनही दोघे पाहू लागले.
विक्रीतून मिळालेले उद्योजकतेचे धडे
परडी कुटुंबामध्ये सर्वजण मोलमजुरी करत असताना सोनाली ताईंना सतीश बनकर यांच्याकडे उद्योजकतेचे धडे मिळाले. बनकर यांचा अंडी पॅकिंग करून , मॉलमध्ये विक्री करण्याचा व्यवसाय होता. अंडी पॅकिंग करण्याची जबाबदारी सोनाली यांच्याकडे होती. अंडी पॅकिंगच्या कामात तरबेज झाल्यानंतर, त्यांनी पॅकिंगसाठी एका वेफर्स कंपनीत काम केले
या ठिकाणी वेफर्स निर्मिती आणि पॅकिंगचे धडे आत्मसात करत त्यांनी स्वतः वेफर्स उत्पादन करण्याचा विचार पती नितीन यांच्याकडे मांडला. पतीनेही होकार दिल्यावर घरच्या घरी केळी वेफर्स निर्मितीला सुरुवात केली पहिल्यांदा एक डझन केळीचे वेफर्स तयार केले.
पण त्यात यश न मिळाल्यामुळे सोनालीताईनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये वेफर्स प्रक्रियेबाबत प्रशिक्षण घेतले. तसेच परिसरातील लहान स्तरावरील वेफर्स निर्मिती युनिटला भेट देऊन प्रक्रिया ते विक्री तंत्राचा अभ्यास केला.
कोणतेही उत्पादन सुरू करताना बाजारपेठेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने दोघांनी पहिल्यांदा परिसरातील वेफर्स निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून वेफर्स आणून स्वतः पॅकिंग करून विक्री सुरू केली. यासाठी भोसरी, रांजणगाव, शिक्रापूर भागातील हॉटेल, चहा टपरी चालकाकडे वेफर्सचे सॅम्पल देऊन हळूहळू विक्री व्यवसाय वाढवत नेला. यासोबतच वेफर्सच्या व्यवसायिक उत्पदनासाठीचा यंत्रणेची माहिती घेतली. वर्षभरात विक्रीचा आलेल्या अनुभवातून स्वतः वेफर्स निर्मितीचा निर्णय घेतला.
वेफर्स निर्मिती उद्योगाला सुरुवात
गेल्या वर्षभरात बाजारपेठेचा सखोल अभ्यास केल्यानंतर एका डझन केळी पासून सुरू केलेला वेफर्स निर्मिती व्यवसायात आता दर आठवड्याला तीन टन केळीवर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया उद्योगासाठी केळीची खरेदी अकलूज,टेंभुर्णी भागातून केली जाते. साधारण 13 ते 14 रुपये सुट्टी केळी आणि 17 ते 18 रुपये घरातील केळीचा दर असतो. खरेदी दर बाजारपेठेवर अवलंबून असतो .
प्रक्रिया उद्योगांमध्ये केळी आणल्यानंतर केळीची साले काढली जातात. थोडा वेळ सुकविल्यानंतर स्लाईस करून मोठ्या कढईत वेफर्स तळले जातात. यानंतर ट्रेमध्ये वेफर्स पसरून त्यावर विविध चवीचा मसाल्यांचा वापर करून सॉल्टी, ब्लॅक पेपर, येलो राऊंड अशा प्रकारचे मसाला वेफर्स तयार केले जातात. विक्रीच्या दृष्टीने दहा ग्राम पॅकिंग केले जाते. एका आठवड्यात तीन दिवस प्रक्रिया आणि तीन दिवस पॅकिंग केले जाते. उद्योगांमध्ये दहा महिलांना रोजगार दिला जातो.
सोनालीताईंचा वेफर्स उद्योगाचा पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत समावेश करण्यात आला. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी सूर्यकांत विरणक, कॅनरा बँकेचा नारायणगाव शाखेचे अधिकारी अभिषेक माने यांच्या मार्गदर्शनाने 23 लाखाचे कर्ज सोनालीताईंना उपलब्ध झाले. स्वतःचे सात लाख रुपयांचे भांडवल उभारत त्यांनी तीस लाखाची गुंतवणूक केली आहे.
बाजारपेठेत स्वतःची वेगळी ओळख होण्यासाठी ‘सोनाली वेफर्स’या नावाने ब्रॅण्ड करून, त्याचे आकर्षक वेस्टण करून पॅकिंग केले जाते. वेफर्सचे वितरण भोसरी पासून बोटा आणि नगर रोडवरील वाघोली, रांजणगाव, शिक्रापूर परिसरात केले जाते. सध्या महिन्याला तीन लाख रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र कर्जाचे हप्ते आणि इतर खर्च वगळता सध्या आर्थिक ताळमेळ बसत चालला आहे. येत्या काळात बटाटा वेफर्स निर्मितीची सुरुवात करण्यासाठी प्रक्रिया उद्योगांमध्ये विविध चाचण्या सुरू आहेत. पुढील महिन्यांमध्ये बटाटा वेफर्सचे उत्पादन सुरू करण्याचे नियोजन सोनालीताईंनी केले आहे.












