ऊस पिकविणाऱ्या या भागातून सुमारे ४०० शेतकऱ्यांनी एकत्रित येत गेल्या तीन-चार वर्षांपासून केळीचा पर्याय निवडला,वाचा सविस्तर ..

दक्षिण सोलापूर तालुक्यामधील फताटेवाडी, होटगी,आहेरवाडी,यासह अक्कलकोटच्या नागणसूर,आंदेवाडी, केगाव, या ऊस पट्ट्यामध्ये अलीकडे निर्माण झालेली पाण्याची समस्या, उसाला मिळणारा दर आणि त्याचाही असलेला बेभरवसा,उसाची घटणारी उत्पादकता, याचा विचार करून पारंपरिक पद्धतीने ऊस पिकविणाऱ्या या भागामधून सुमारे ४०० शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गेल्या तीन-चार वर्षांपासून केळीचा पर्याय निवडला आहे. तब्बल २२५ एकरपर्यंत आज या भागामध्ये केळीचे क्षेत्र विस्तारले असून , शिवाय निर्यातीतही गुणवत्तापूर्ण, दर्जेदार उत्पादनामुळे शेतकऱ्यांनी आघाडी घेतली आहे.

कृषी अधिकारी म्हणून निवृत्त झालेले श्रीधर गावंडे यांनी दक्षिण सोलापुरातच यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून ही कामगिरी पार पडली .मागील तीन वर्षांपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण केळी उत्पादन शेतकरी घेत आहेत. स्थानिक बाजारात केळीची विक्री करण्या बरोबरच थेट इराण,दुबई इराक, या देशांना केळीची निर्यातही येथील शेतकरी करत आहेत. विशेषतः पारंपरिक पद्धतीला केळीच्या व्यवस्थापनामध्ये छेद देत शेतकरी केळीतील आधुनिक तंत्रज्ञानाच वापर करून निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत.

आंदेवाडीतील श्री. गावंडे यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये केळी लागवड करतानाच अन्य शेतकऱ्यांनाही केळीसाठी प्रोत्साहन त्यांनी दिले . त्यामुळे ४०० शेतकरी या दोन्ही तालुक्यांतून तयार झाले. कृषी अधिकारी म्हणून गावंडे यांनी या भागामध्ये काम केल्यामुळे त्यांना , इथल्या प्रश्नांची चांगली माहिती होती,शेतकऱ्यांची मानसिकता या बाबत माहिती होती . या पट्ट्यामध्ये वर्षानुवर्षे ऊस हे पीक शेतकरी घेत होते . या भागामध्ये केळी रुजविणे अवघड होते, पण केळीच का ? या बाबतचे महत्त्व श्री. गावंडे यांनी शेतकऱ्यांना पटवून सांगितले .

केळीतील तज्ज्ञ, अभ्यासक सागर कोपर्डेकर (कोल्हापूर) यांचे तीन वर्षापूर्वी लागवडी अगोदर खास चर्चासत्र ठेवले होते . या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान झाले आणि पुढे शेतकरी टप्प्या-टप्प्याने एकत्र येऊ लागले . आज सुमारे ४०० शेतकऱ्यांचा केळी उत्पादक म्हणून ग्रुप तयार झाला आहे. व्हॅाटसअॅप ग्रुपही त्यांचा तयार केला आहे. त्यामध्ये केळी पिकावरील शंका-समाधान ,केळीतील अडचणी, यावर चर्चा होते. त्यातूनच उत्तम केळी उत्पादक म्हणून अनेक शेतकरी नावाजले आहेत. एकरी किमान २५ ते ३० टनापर्यंतचे यापैकी बहुतेक शेतकरी उत्पादन घेत आहेत. केवळ उत्पादनच नव्हे, तर निर्यातक्षम केळी चे उत्पादन घेत आहेत.

यंदा ४ हजार टनाची निर्यात..

२०२२ मध्ये लागवडीच्या दुसऱ्याच वर्षी पहिल्यांदा तीन शेतकऱ्यांनी निर्यात करण्यास सुरवात केली. १०० टन केळीची त्यावर्षी निर्यात झाली. २०२३ मध्ये केळीची निर्यात १५० टन झाली ही संख्या सातने वाढली. तर या वर्षी निर्यातक्षम उत्पादन घेत तब्बल ३६ शेतकऱ्यांनी निर्यात केली. यामधून तब्बल ४ हजार टन केळी यशस्वीपणे निर्यात झाली आहे. यंदा प्रतिकिलो सरासरी १४ ते १७ रुपये आणि सर्वाधिक २७ रुपयांपर्यंतचा दर केळी निर्यातीसाठी मिळाला आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांचे प्लॅाट सुरूच आहेत. या भागामध्ये पूर्वी साधे व्यापारी किंवा निर्यातदार फिरकत सुद्धा नव्हते, पण आज केवळ निर्यातदार
केळीच्या गुणवत्तेमुळे थेट बांधावर येत आहेत.

शेतकऱ्यांचा केळी पिकाला प्रतिसाद वरचेवर वाढत आहे. शेतकरी एकत्रित येत केळी उत्पादन घेतले जात असल्याने सर्वांचाच फायदा होत आहे. यावर्षी देखील एप्रिल महिन्याच्या शेवट पर्यंत जवळजवळ ७० हजार रोपांची नव्याने लागण होणार आहे.
– श्रीधर गावंडे, निवृत्त कृषी अधिकारी, सोलापूर.

आम्हाला उस पिकातून काहीच मिळत नव्हते, परंतु आता केळीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. केळी या पिकामुळे आमच्या शेतीचाच नव्हे, तर आमच्या आयुष्यातच बदल घडून आला आहे.
– सुभाष हिप्परगे, केळी उत्पादक, आहेरवाडी.

Leave a Reply