आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज वाटप करण्यास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १ एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेच्या वतीने या कर्जाचा लाभ देण्यात येणार आहे.
खरिपासाठी जिल्हा बॅँकेने सुमारे २ हजार कोटींचे पीककर्ज वाटपाचे ध्येय ठेवले आहे. हेच उद्दिष्ट मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये एक हजार आठशे कोटी रुपयांचे ठेवण्यात आले होते. जिल्हा बँकेतून प्रत्यक्षात सुमारे एक हजार ९०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे सोमवारी (ता.१५) सांगण्यात आले.
खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यानुसार खरीप हंगामातील पिकांसाठी
दरवर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत तर, रब्बी हंगामातील पिकांसाठी १ आक्टोबर ते ३१ मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये पीककर्ज वाटप करण्यात येते. खरीप पिकांसाठी वाटप करण्यात आलेले पीककर्ज हे कमी कालावधी साठी असते.
त्यानुसार ३१ मार्चपर्यंत दरवर्षी या कर्जाची परतफेड करणे बंधनकारक असते. या मुदतीमध्ये ज्या शेतकऱ्यांने कर्जाची परतफेड केली आहे त्याला तीन लाखांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याजाचा फायदा मिळत असतो. या शिवाय पुढे नवीन वर्षातील खरीप हंगामातील पिकांसाठी हेच शेतकरी कर्ज घेण्यास पात्र ठरत असतात, असेही यावेळी सांगण्यात आले.












