जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अजूनही सर्वदूर जोरदार पाऊस पडला नाही . त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढत आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून काही भागात पुढील ५ दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून हलका का होईना पण पावसाचा जोर, नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात व पेठ, कळवण, सटाणा, मालेगाव सुरगाणा, आणि देवळा तालुक्यात अजूनही कायम आहे. तसेच रविवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी हवामान अंदाजानुसार तेथे मध्यम पावसाची शक्यता टिकून आहे. तर पुणे, नगर, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर सातारा,जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील निफाड, येवला, नांदगाव ,सिन्नर, दिंडोरी,आणि चांदवड तालुक्यात १० जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाड्यात १० जुलैपर्यंत जालना,परभणी, धाराशिव , हिंगोली, नांदेड, आणि लातूर जिल्ह्यात मध्यम तर छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .विदर्भ व कोकण मध्ये जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी वातावरणीय प्रणल्यांच्या प्रमाणात अपेक्षित अति जोरदार पाऊस जाणवत नाही. मध्यम पाऊस सध्या विदर्भातही जाणवत आहे. येत्या पाच दिवसामध्ये ह्या ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच नागपूर, भंडारा ,अमरावती, आणि गोंदिया ह्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे , असेही त्यांनी स्पष्ट केले. अतिजोरदार पाऊस महाराष्ट्रात कधीपासून पडू शकतो? याविषयी सांगताना माणिकराव खुळे म्हणाले की, चांगल्या पावसाची अपेक्षा विभागवार प्रणल्यातून असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये सध्या व्यापक जोरदार पाऊस न होता भाग बदलतच मध्यम पाऊस होत आहे. काही जिल्ह्यामध्ये अजूनही शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहे.
परंतु आता देशाच्या मध्यावर स्थापित असलेला मुख्य मान्सूनी आस त्याच्या सरासरी जागेपासून जोपर्यंत अधिक दक्षिणेला सरकत नाही तोपर्यंत नद्या धरणात,खळखळून आवक वाढणार नाही. अर्थात जुलै महिन्यात ही शक्यता घडून येऊ शकते.