आता लहान लहान दूध प्रकल्पांसह मोठ्या दूध संघांच्या चिलींग सेंटरला गाय दूध अनुदानासाठी लॉगीन आयडी मिळणार असून, माहिती भरण्याच्या कामाला गती मिळावी यासाठी दुग्ध विभागाने हे पाऊल उचलले आहे.
संबंधित प्रकल्पांनी दुग्ध विभागाकडे बुधवार (दि. १०) पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सांगली जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी नामदेव दवडते आणि कोल्हापूर जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रकाश आवटे यांनी केले आहे.
सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये घेतला होता . दोन महिने त्यानुसार अनुदान दिले. त्यानंतर अनुदान बंद केले होते. परंतु , गायीच्या दुधाचे दर कमी होऊ लागल्यामुळे १ जुलैपासून राज्य शासनाने अनुदान पुन्हा सुरू केले आहे.
त्यासाठी दूध उत्पादकाची दर दहा दिवसांची माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे . केवळ जिल्हास्तरीय मोठ्या दूध संघांना माहिती भरण्याचे लॉगीन दिल्यामुळे हे काम वेळेमध्ये पूर्ण होत नसल्यामुळे . यासाठी छोट्या छोट्या प्रकल्पांना जर लॉगीन दिले तर पटकन माहिती भरली जाईल , त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
लॉगीन आयडी देणार पण, या अटी राहणार
• दुग्ध प्रकल्प किंवा शीतकरण केंद्र याचे किमान दूध संकलन प्रतिदिन १० हजार लिटर असावे.
• अर्जासोबत प्रकल्पाचे ‘एफएसएसएआय’ नोंदणी प्रमाणपत्र जमा करण्यात यावे.
• प्रकल्पाने चेकर आणि मेकर यांची नावे, मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडीसोबत जमा करावी .
• विनियोग आणि सध्याची होत असलेली हाताळणी याचा तपशील सोबत जमा करावा.
१ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत दूध अनुदान..
दूध अनुदानाची मुदत १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत असणार आहे . पशुधन टॅगींगसह इतर माहिती भरणे बंधनकारक असल्यामुळे पहिल्या टप्प्यातील अनुदानापासून सुमारे वीस हजार दूध उत्पादक वंचित राहिले होते.