राज्यात द्राक्ष पट्टा असलेल्या नाशिकसह काही ठिकाणी दोन दिवस ढगाळ वातावरण राहिले, मात्र या ठिकाणी पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान लवकरच थंडी सुरू होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवार व शनिवार दि.१५ व १६ नोव्हेंबर रोजी दोन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर नगण्य अशा किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते.
विशेषत: मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर ह्या जिल्ह्यातच हा परिणाम अधिक या दोन दिवसात जाणवेल, असे वाटते. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक ह्या जिल्ह्यात मात्र हा परिणाम जाणवणार नाही. या निरभ्र आकाशामुळे सध्या सकाळ-संध्याकाळी जाणवणाऱ्या थंडीला, या दोन दिवसासात काहीसा विराम मिळेल, असे हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांना वाटते.
सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान ३३ तर पहाटेचे किमान तापमान २१ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असून ही दोन्हीही तापमाने हे जवळपास सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक जाणवतात.
दक्षिणेकडील चार राज्यात होणाऱ्या पूर्वीय वाऱ्याच्या प्रणालीतून सध्या तेथे पडणाऱ्या पावसाचा परिणामातूनच मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात, आज दि. १६ नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे.
रविवार दि. १७ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा हळूहळू थंडीसाठीची स्थिती पूर्ववत होईल, असे वाटते, तसेच मुंबईसह कोकणातही त्यामुळे ढगाळ वातावरणही निवळेल, असे वाटते.
दरम्यान सोमवार दि.२५ नोव्हेंबरपर्यन्त चक्रीवादळाच्या बीजरोवणी साठीची कोणतीही वातावरणीय निर्मितीही दोन्हीही समुद्रात सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातही थंडीसाठी अटकाव करणारा कोणताही वातावरणीय परिणाम जाणवणार नाही, असा अंदाज माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.