ऊसावरील खोडकिड आणि पांढऱ्या माशीचा, तसेच हळदीवरील कंदमाशीचा असा करा बंदोबस्त..

सध्याच्या हवामानानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने ऊस, हळद पिकासह हरभरा, ज्वारीसाठी पुढील प्रमाणे हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.

पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात लवकर संपवावी. ऊस लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26 किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 65 किलो युरिया + 531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.

ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

*हळद पिकासाठी सल्ला*
हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. हळदीच्या पानावरील ‍ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

*हरभरा पिकासाठी सल्ला*
जोमदार वाढीसाठी हरभरा पिक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली कोळपणी करावी.

*करडई*
मागील काही दिवसात किमान तापमानात झालेल्या घटीमूळे, वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या व्यवस्थापनासाठी पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात.

पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. परिणामी पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

*ज्वारीसाठी सल्ला*
लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *