Maharashtra CM Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यातही भाजपाने १३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवल्याने मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाईल अशी अटकळ बांधण्यात येत आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) समर्थकांनीही शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा अशी भूमिका घेतली होती. परिणामी मुख्यमंत्रीपदासाठी (Maharshtra CM) शिंदे हे अडून बसल्याच्या चर्चा माध्यमातून होताना दिसत होत्या. याशिवाय शिंदे वेगळा काही पर्याय निवडतील अशीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र काल दिनांक २७ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदाचा मोह नसून भाजपाचे वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरील शिंदे यांचा दावा संपुष्टात येऊन आता भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास नक्की झाले आहे.
शिंदे यांनी का सोडला दावा
राजकीय वर्तुळात असे बोलले जात आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव असल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. याचे कारण म्हणजे काही प्रकरणांमध्ये त्यांना ईडी किंवा सीबीआयचा धाक पुन्हा घातला गेल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण हे निवडणुक चिन्ह कोणाचे याचा निकाल अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत तो निकाल शिंदे यांच्या बाजूने लागत नाही तोपर्यंत शिवसेना त्यांच्या ताब्यात आली असे ठरणार नाही. यासंदर्भातील जाणीव भाजपाच्या वरिष्ठांनी शिंदे यांना करून दिल्याचे सांगितले जात असून त्यानंतरच शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे.
शिंदेचे पुढचे राजकारण काय?
काही माध्यमात अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांनी सध्या मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला असला, तरी ते वेट अँड वॉचची भूमिका घेतील. योग्य वेळ आल्यानंतर म्हणजेच धनुष्यबाण हस्तगत केल्यानंतर ते विद्यमान सरकारला दणका देण्याची किंवा काही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तरी एकनाथ शिंदे हे जुळवून घेण्याच्या भूमिकेत राहतील अशीही अटकळ राजकीय वर्तुळात आहे.
दोन वर्षांपूर्वी शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड पुकारून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर तळागाळात पोहोचणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री अशी प्रतिमा अल्पावधीतच शिंदे यांनी तयार केली. राज्यातील बहिणींचा लाडका भाऊ ही प्रतिमा तयार करण्यात ते यशस्वी झाले. समजा आता त्यांनी पुन्हा बंडखोरी केली, तर त्यांच्या विश्वासार्हतेवर शिक्का पडून त्यांची प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचे काही राजकीय जाणकार सांगत आहेत.