Soyabean Bajarbhav : मागील काही आठवड्यापासून बाजारसमित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव (soybean Bajarbhjav) अजूनही हमीभावाच्या खालीच असून सध्या लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४१०० ते ४३०० रुपये असा बाजारभाव मिळत आहे. लातूर बाजारात दररोज साधारण ३५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होताना दिसत आहे.
अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यातही बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनची आवक ठिकठाक आहे. मात्र बाजारभाव कमी असूनही शेतकरी बाजार समित्यांमध्येच सोयाबीन विक्री करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची आर्द्रता ही १५ टक्कयांहून अधिक आहे. त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव कमी मिळताना दिसत आहे.
या ठिकाणी मिळेल पाच हजारापर्यंत भाव…
राज्यात विधानसभा निवडणुक मतदानाच्या केवळ एक दिवस आधीच सोयाबीन शेतकऱ्यांसाठी हमीभाव केंद्रांकडून खरेदी सुरू केली होती. सध्या काही शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून आणि नांव नोंदणी करून या खरेदीचा लाभ घेतला आहे. नव्या निर्णयानुसार १५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची खरेदी येथे होणार आहे. असे असले तरी सध्या १२ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनलाच खरेदी करण्यास ही केंद्र प्राधान्य देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी प्रचलित बाजारसमित्यांनाच विक्रीसाठी प्राधान्य देत आहेत.
असे असले तरी शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर प्रति क्विंटलला ४ हजार ८९२ रुपये म्हणजे पाच हजाराच्या आसपास बाजारभाव मिळत आहे. एका वेळी २५ क्विंटल सोयाबीन केंद्रावर विक्री करता येते. अनेक शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला आहे. सोयबीन हमी भाव केंद्रांवर विक्री करण्यासाठी नाव नोंदणी करण्याची मुदत ही १५ डिसेंबर पर्यंतच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच नोंदणी करून बाजारभावापेक्षा ५०० ते ७०० रुपये जास्त दराचा लाभ घेण्याचे आवाहन संबंधित अधिकारी करताना दिसत आहे.