Sugarcane Crushing: गाळप हंगामात शेजारील कर्नाटकने यंदाही राज्याच्या सीमेवरील ऊस पळवला असून सध्या कोल्हापूर परिसरातील साखर कारखान्यांना ऊसाची टंचाई भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कागल, शिरोळ, हातकणंगले, निपाणी, चंदगड या परिसरासह सीमेवरील ऊसपट्टातला ऊस सध्या कर्नाटकचे साखर कारखानदार तोडताना दिसत असून येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणचा ऊस तर तोड होऊन गाळपासाठी कर्नाटकात पोहोचलाही असल्याचे समजते.
कर्नाटकातील सीमाभागात ऊस गाळपाचा आंतरराज्य परवाना असलेले अनेक साखर कारखाने आहेत. त्यांना ऊसाची हंगामात आवश्यकता असते. याचे कारण म्हणजे त्या पट्ट्यात ऊसाचे उत्पादन घसरले आहे. त्यामुळे यंदाही त्यांनी राज्यातील ऊस पळवला आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक कारखान्यांचे गाळप कमी होण्याची शक्यता आहे.
यंदा निवडणुकांमुळे साखर हंगाम लांबणीवर टाकण्याची सत्ताधाऱ्यांची योजना होती. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता नव्हती, तसेच साखर हंगाम हा निवडणुकांनंतर म्हणजेच २१ नोव्हेंबर नंतर सुरू केल्यास कर्नाटकातील कारखाने ऊस पळवतील असा अंदाज अनेक कारखान्यांना आला होता. त्यामुळेच कोल्हापूर सांगली परिसरातील काही कारखान्यांनी १५ नोव्हेंबरलाच गळीत हंगाम सुरू करण्याची भूमिका घेतली. असे असले, तरी राजकीय पक्षांशी संबंधित अनेक साखर कारखान्यांचे संचालक, पदाधिकारी हे निवडणुकीत गुंतल्याने त्याचा फायदा कर्नाटकातील कारखान्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.