Maharashtra Weather Update: पुढील दोन- ते तीन दिवस राज्यात हवामानाचा गारठा कायम राहणार असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान राज्यात दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून पुढील २४ तासांत उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
निफाड व दिंडोरी या द्राक्षपट्टयातील शेतकऱ्यांनी कमी तपमानामुळे द्राक्षशेतीचे नुकसान टाळण्यासाठी रात्री व पहाटे बागांच्या परिसरात शेकोट्या पेटविण्यास सुरू केले आहे. काही ठिकाणी मोठ्या क्षमतेचे विद्युत बल्ब लावून काळजी घेण्यात येत आहे.
काल दिनांक २७ रोजी राज्यात नगरचे तापमान सर्वात कमी म्हणजेच ९.४, नाशिकचे तापमान १०.६, तर पालघरचे सर्वाधिक २२.४ अंश से. तापमान होते. महाबळेश्वरमध्ये तापमान अजूनही स्थिर असून थंडीची लाट कायम आहे.
निफाडचे तापमान निचांकी
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील थंडीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात काल तपमान ९ अंशाच्या खाली गेले. निफाडजवळ असलेल्या विभागीय गहू संशोधन केंद्रातील नोंदीनुसार ८.३ अंश से. इतके किमान तपमान या ठिकाणी नोंदवले गेले. या ठिकाणी ऊसतोड कामगार, शेतकरी, दुध उत्पादक यांना या थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून द्राक्षबागांना या तपमानाचा फटका बसू नये म्हणून शेकोट्या पेटण्यास सुरूवात झाली आहे.