Sugar Crushing Season : ऊसाच्या वाढीव एफआरपी मिळणार, पण ही अट पूर्ण केल्यानंतरच, वाचा सविस्तर..

Sugar Crushing Season : राज्याच्या ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांची अपेक्षा असलेल्या नव्या एफआरपीचा शासन आदेश सहकार विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने दि. २७/०२/२०२४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, गाळप हंगाम २०२४-२०२५ साठीचा किमान एफआरपी ऊसदर प्रसिध्द केलेला आहे.या अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊसदर विचारात घेता, गाळप हंगाम २०२३-२०२४ साठी जाहिर केलेल्या एफआरपी ऊसदरात बदल झालेला आहे. त्यानुसार आता २०२४-२०२५ हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत नवा आदेश लागू राहिल आणि शेतकऱ्यांना त्यानुसार नव्या दराने एफआरपी मिळेल.

या शासनाच्या आदेशानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफआरपी ऊसदर निश्चित करताना आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा निश्चित करणे आवश्यक असल्याने शासनाने अटी नक्की केल्या आहेत. जाणून घेऊ यात त्या अटी

गाळप हंगाम २०२४-२०२५ व त्यापुढील हंगामांचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफ.आर.पी. ऊसदर अदा करताना आधारभूत धरावयाचा साखर उतारा महसूल विभागनिहाय पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत एफ.आर.पी. ऊस दर अदा करण्यासाठी आधारभूत धरावयाचा साखर उतारा हा १) पुणे व नाशिक विभागासाठी १०.२५% इतका, तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागासाठी ९.५०% इतका किंवा त्याच्यावर असणे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे आधारभूत साखर उत्तारा विचारात घेऊन त्या त्या महसूल विभागातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाने सन २०२४-२०२५ च्या हंगामासाठी एफ.आर.पी. व्या धोरणात दि.२७/०२/२०२४ च्या अधिसूचनेद्वारे निश्चित केलेल्या मुलभूत एफ.आर.पी. दरानुसार हंगामाच्या सुरुवातीचा किमान एफ.आर.पी. ऊस दर खालीलप्रमाणे निश्चित करून ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील कलम ३ नुसार अदा करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश शासनाने पारीत केले आहेत.

१) हंगाम २०२४-२०२५ करीता बेसिक १०.२५% साखर उताऱ्यासाठी रास्त व किफायतशीर ऊत्सदर प्रति क्विंटल रू. ३४०/
२) साखर उतारा १०.२५% व्या वरील प्रत्येक ०.१% उतारा वाढीसाठी प्रिमियम दर रु. ३.३२ प्रति क्विंटल
३) साखर उतारा १०.२५% पेक्षा कमी परंतु ९.५०% पेक्षा जास्त असलेल्या प्रकरणी, प्रत्येक ०.१% उतारा घटीसाठी रू. ३.३२ प्रति क्विंटल तथापि, साखर उतारा ९.५०% किंवा
त्यापेक्षा कमी असल्यास रास्त व किफायतशीर ऊसदर रू. ३१५.१० प्रति क्विंटल या प्रमाणे एफआरपी शेतकऱ्यांना मिळेल.

दरम्यान आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा यासह इतर सर्व धोरणात्मक बाबी या दि.२१/०२/२०२२ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील उपरोक्त आदेश गाळप हंगाम २०२४-२०२५ पासून लागू होतील, असेही शासन आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *