Rabi Pik Sinchan: सावधान! रब्बी पिकांना पाणी देताना करू नका ही चूक, अन्यथा होतील मोठे दुष्परिणाम..

Rabi Crop irrigation mangement techniques, do’s and don’ts in Rabi water mangement सध्या रबी पिकांचा हंगाम सुरू असून अनेकांच्या शेतात गहू, हरभरा, ज्वारीची लागवड केलेली आहे. राज्यातील काही भागात पाण्याची चांगली उपलब्धता असते. काही शेतकऱ्यांकडे तर कालव्याचे आणि विहिरीचे दोन्ही प्रकारचे पाणी असते. मात्र पाणी व्यवस्थापन करताना जर ही चूक केली, तर तुम्हाला महागात पडेल. जाणून घेऊ योग्य पाणी व्यवस्थापनाचा उपाय.

पिकांच्या जोमदार वाढीसाठी व जास्तीत जास्त उत्पादनाकरिता पिकास वाढीच्या नाजूक अवस्थेत म्हणजे पाण्यासाठी असलेल्या संवेदनक्षम अवस्थेत जमिनीच्या प्रकारानुसार योग्य मात्रेत पाणी देणे आवश्यक असते. धरणाखाली भिजणाऱ्या क्षेत्रात पिकांना त्याच्या वाढीच्या नाजूक अवस्थेत पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. कारण पाण्याची पाळी साधारणतः २ ते ३ आठवड्यांच्या अंतराने येते. तसेच पुढची पाण्याची पाळी केव्हा येईल याची शेतकऱ्यांना खात्री नसल्याने ते पिकास गरजेपेक्षा फार जास्त प्रमाणात पाणी देतात.

त्यामुळे पिकास योग्य मात्रेत पाणी देण्याची संकल्पना मोडीत निघते. हे जास्तीचे दिलेले पाणी पिकासाठी व जमिनीकरताही फायद्याचे न ठरता हानिकारकच ठरते. जास्त दिलेले पाणी पिकाच्या मुळाच्या कक्षेच्या खाली जाऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे जमिनीतील हवा, पाणी व माती यांचे संतुलन बिघडते व पिकास पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेण्यात अडचणी निर्माण होतात. पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी भूपृष्ठाजवळ येऊन जमिनी चिबड बनतात तसेच कालांतराने जमिनीतील खालच्या थरातील क्षार भूपृष्ठावर येऊन जमिनी क्षारयुक्तही होतात.

जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या हंगामात घेतलेल्या पिकांना उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १३ ते १५ दिवसांनी व हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी पाणी द्यावे, अशा शिफारशी आहेत. धरणाखालील लाभक्षेत्रात पाण्याची पाळी लांबविल्यास, विशेषतः उन्हाळी हंगामात पिकाला पाण्याचा ताण बसतो आणि त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी भूजल म्हणजे विहिरीतील, कुपनलिकेतील आणि भूपृष्ठावरील म्हणजे कालव्याच्या उपसा सिंचनाच्या पाण्याचा आवश्यकतेनुसार समन्वित वापर होणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र ओलीत करणेही महत्त्वाचे असते.
फक्त कालव्याचे पाणी सतत सिंचनासाठी वापरले तर पुष्कळ पाणी जमिनीत खोलवर मुरते.

त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत सारखी वाढ होते आणि शेवटी ही पातळी भूपृष्ठापर्यंत येते. अशा वेळी त्या परिसरातील विहिरींच्या पातळीतही वाढ होऊन काही ठिकाणी विहिरी उचंबळून वाहतानाही दिसतात. अशा प्रकारे पाण्याची पातळी खूप काळापर्यंत भूपृष्ठाजवळ राहिली तरी जमिनीच्या खालच्या थरातील क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर येतात. अनुकूल वातावरण बनल्यामुळे किडींची संख्या व प्रादुर्भाव वाढतो. पिकांची वाढही व्यवस्थित होत नाही. म्हणून भूजलाची पातळी वाढून निचऱ्याच्या समस्या निर्माण होईपर्यंत कालव्याच्या पाण्याचा वारेमाप वापर करू नये. तसेच सतत विहिरीतील पाण्याचाच वापर केला गेल्यास उपसा मोठ्या प्रमाणात होऊन जमिनीत पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात मुरले न गेल्याने विहिरी कोरड्या पडण्याची स्थितीही निर्माण होते. त्याकरिता कालव्याचा तसेच विहिरीच्या पाण्याचा एकत्रितपणे असा वापर करावा की जेणेकरून जमिनीतील पाण्याची पातळी फार खोल जाणार नाही किंवा अगदी भूपृष्ठाजवळ येईपर्यंत वाढणार नाही.

कालवा व विहीर पाण्याचा संयुक्त वापर कसा करावा?

१. जमिनीतील पाण्याची पातळी खूप खोल गेली असेल तर कालव्याच्या पाण्याचा वापर शेतीसाठी करावा व शक्य तितके जास्त पाणी जमिनीत मुरू द्यावे.
२. जमिनीतील पाण्याची पातळी भूपृष्ठाजवळ असेल तर शेतीस विहिरीतील पाणी भूजल पातळी ५ फुटांपेक्षा जास्त खोल जाईपर्यंत वापरावे.
३. रब्बी हंगामात कालव्याचे व उन्हाळी हंगामात विहिरीचे पाणी पिकासाठी वापरावे.
४. कालव्याचे पाणी वेळेवर, पिकाच्या गरजेनुसार न सुटता खूप दिवसांच्या अंतराने सोडले जात असेल तर कालव्याचे पाणी ज्यावेळी उपलब्ध असेल त्यावेळी वापरावे व मधल्या काळातील पिकांची पाण्याची गरज विहिरीच्या पाण्याने भागवावी.
५. गरज भासली तर शेतीस देऊन उरलेले जास्तीचे पाणी नाल्यावाटे सोडून द्यावे व कोणत्याही परिस्थितीत भूजल पातळी ५ फुटांखाली राहील हे पाहावे.

_- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी शास्त्रज्ञ_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *