Rabi Crop Advisory : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने या आठवड्यात पुढील प्रमाणे कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.
पीक व्यवस्थापन
१. वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही.
२. तूर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास आवश्यकतेनूसार हलके पाणी द्यावे.
३. रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
४. बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. उशीरा पेरणीसाठी 125 ते 150 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. गहू पिकाची पेरणी करून 21 दिवस झाले असल्यास गहू पिकास हलके पाणी द्यावे.
५. रब्बी मका पिकाची पेरणी नोव्हेंबर पर्यंत करता येते पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.
६. मका पेरणी करतांना 75 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि 75 किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्यांनी द्यावे, याकरिता 289 किलो 10:26:26 + युरिया 100 किलो किंवा 500 किलो 15:15:15 किंवा 375 किलो 20:20:00:13 किंवा युरिया 163 किलो + 469 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 126 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी आणि 163 किलो युरिया प्रति हेक्टर पेरणीनंतर एक महिन्यांनी द्यावा.10:37 AM