Maharashtra CM : राज्याचा मुख्यमंत्री लवकरच जाहीर होणार असून येत्या दोन डिसेंबरच्या आसपास शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान कुणीही मुख्यमंत्री झाले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असून सध्या ते एकप्रकारे सरकारचे किंगमेकर होताना दिसत आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सध्या सत्ता स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नसल्या तरी काल दिनांक २८ नोव्हें रोजी दिल्लीत भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. या बैंठकीत राज्याचा मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे.
दरम्यान या बैठकीचा फोटो सध्या व्हायरल होत असून त्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य दिसत आहे, तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा गंभीर दिसत आहे. यावरून अजित पवार गटाला उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाती देण्यात येण्याची चर्चा आहे, तर शिंदे गटाची त्यामुळे कोंडी झाल्याची चर्चा आहे.
भाजपाकडे १३२ आमदार आणि ७ अपक्षांचे पाठबळ असून अजित पवार गटाकडे ४१ आमदारांचे पाठबळ आहे. अजित पवार यांच्यासोबत आधीच फडणवीस आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली असून त्यांच्या गटाने भाजपाला आणि भाजपाच्या मुख्यमंत्र्याला विनाशर्त पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे भाजपा अजित पवारांना जवळ करणार असून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची सत्ता स्थापनेत आवश्यकता नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अशा स्थितीत राजकीय गरज म्ह्णून अजित पवार यांच्या पक्षाला महत्व येणार असून एकप्रकारे हा पक्ष किंगमेकरची भूमिका निभावणार असल्याचे चित्र आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे कुठली भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.