यंदाच्या हंगामात सोयाबीनला (soybean bajarbhav) अजूनही हमीभावापेक्षा कमीच बाजारभाव मिळत आहेत. अशा वेळी अनेक शेतकरी सोयाबीनची साठवण करण्याला पसंती देत आहेत, तर काही शेतकरी सोयाबीन गोडाऊनमध्ये ठेवून त्यावर वखार महामंडळाच्या योजनेनुसार कर्ज घेत आहेत. अनेकांना अजूनही सोयाबीन विकायचा की साठवायचा याचा संभ्रम आहे. आजच्या बाजारभावातून सोयाबीनबाबत काय निर्णय घ्यायचा याचा अंदाज शेतकऱ्यांना येऊ शकतो.
आज दिनांक २९ नोव्हेंबर रोजी राज्यात अमरावती बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक म्हणजेच सुमारे ७ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी सोयाबीनचा कमीत कमी बाजारभाव ४ हजार रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी बाजारभाव ४११० रुपये प्रति क्विंटल असा होता.
त्या खालोखाल विदर्भातील कारंजा बाजारसमितीत आज सोयाबीनची मोठी आवक झाली. आज या ठिकाणी सोयाबीनची सहा हजार क्विंटल आवक होऊन कमीत कमी बाजारभाव ३८०५ रुपये तर सरासरी बाजारभाव ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल असा होता.
आज राज्यात सर्वधिक सरासरी बाजारभाव उमरखेड बाजारसमितीत मिळाला. या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४४०० रुपये बाजारभाव सुरू आहेत. मात्र येथील आवक अतिशय कमी आहे.
राज्यात सर्वात कमी बाजारभाव मलकापूर बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला मिळाले. याठिकाणी सरासरी ३६३५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला, तर २६७० क्विंटल इतकी आवक बाजारात झाली.
दरम्यान राज्यातील हिगोली बाजारात पिवळ्या सोयाबीनला सुमारे ४ हजार ४० रुपये प्रति क्विंटल, तर सोलापूर बाजारात ४ हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला. सोलापूर बाजारात ४ हजार, तर जळगाव बाजारात ४३०० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर सोयाबीनसाठी मिळाला.