Markadwadi Voting: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस तालुक्यात असलेल्या मारकडवाडीची राज्यासह देशातही जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कालपासून सर्वच माध्यमांमध्ये मारकडवाडीची चर्चा अग्रक्रमाने होताना दिसत होती. अचानकपणे या छोट्या गावाची चर्चा का झाली?
हे गाव चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावातील सुमारे ८० टक्के मतदान हे त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांना केले, पण मतमोजणीत प्रत्यक्षात हजाराहून जास्त मते त्यांचे विरोधी असलेले भाजपा उमेदवार राम सातपुते यांना पडली. विशेष म्हणजे निकालानंतर यासंदर्भातील पुरावेही गावाने गोळा केले, त्यातून ईव्हीएम किंवा मतदानात घोटाळा झाल्याचा त्यांनी आरोप केला.
दरम्यान ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप महाआघाडीतर्फे केला जात असतानाच मौजे मारकडवाडी गावाने आमची मते खरंच कुणाला दिली- हे सिद्ध करण्यासाठी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा ठराव केला. त्याची तयारीही केली आणि त्यासाठी तारीख ठरली ३ डिसेंबर. या संदर्भात गावाने तहसिलदारांना निवेदन देऊन मतदानासाठी कर्मचारी देण्याची मागणी केली. इतकेच नव्हे तर मतदानासाठी स्वखर्चाने बुथ मंडप असेही तयार केले.
या प्रकाराने प्रशासनाची धांदल उडाली आणि त्यांनी तातडीने पोलिसांचा मोठा फौजफाटा पाठवत गावात जमावबंदीचे आदेश लागू केले, तसेच मतदान घेण्यास मनाई केली. मात्र संतप्त ग्रामस्थांनी कुठल्याही स्थितीत आपण मतदान घेणार आणि त्यासाठी पोलिसांनी लाठीमार किंवा गोळीबार केला, तरी बेहत्तर अशी भूमिका घेतल्याने गावासह परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर हे गाव दोन-तीन दिवसांपासून चर्चेत आहे.
काल दिनांक ३ डिसेंबर रोजी या गावात मतदान होणार होते, पण प्रशासनाते तो प्रयत्न हाणून पाडला असला, तरी सध्या लोकशाही टिकविण्यासाठी गावाने चांगला प्रयत्न केल्याचे आणि पुढाकार घेतल्याचे कौतुक सोशल मीडियासह माध्यमांतूनही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. तर दुसरीकडे या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून गावात तणाव आहे. राजकीय नेते आता दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहे.












