राज्यात मागील दोन दिवसांपासून थंडीसह अनेक भागात धुके आणि ढगाळ वातावरण होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास नाशिकसह अनेक ठिकाणी हलका पाऊस पडल्याचे वृत्त आहे. राज्यात येणाऱ्या काळात कसे असेल हवामान ते जाणून घेऊ.
तमिळनाडू राज्यात घुसलेले ‘ फिंजल ‘ चक्रीवादळ भू-भागावरच क्षीणतेकडे झुकल्यामुळे कर्नाटक राज्य ओलांडून जरी त्याचे अवशेष अरबी समुद्रात प्रवेशले, तरीदेखील ते तीव्र होवू शकले नाही. ते विरळ होवून सोमलियाकडे निघून गेले. त्यामुळे अपेक्षित भाकिताप्रमाणे महाराष्ट्रावर त्याचा विशेष असा वातावरणीय परिणाम जाणवला नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे रविवार दि. ७ डिसेंबर पर्यन्त केवळ ढगाळलेलेच राहून, झालाच तर सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अशा दहा जिल्ह्यात व लगतच्या परिसरात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
त्यानुसार सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात दुपारी ३ चे कमाल तापमान सरासरीइतके म्हणजे ३० तर पहाटे ५ चे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ डिग्रीने अधिक म्हणजे २० डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे.
तर मुंबईसह कोकणात दुपारी ३ चे कमाल तापमान ३१ ते ३४ तर पहाटे ५ चे किमान तापमान २४ ते २६ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकाकी थंडी कमी झाली आहे.
सोमवार दि. ८ डिसेंबर पासून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळून, हळूहळू पुन्हा थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते. सोमवार दि. ८ ते शुक्रवार दि. १३ डिसेंबर पर्यंतच्या पाच दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात पहाटे ५ चे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० ते १२ डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घसरू शकतो.मुंबईसह कोकणातील पहाटे ५ चे किमान तापमान ही सध्या पेक्षा घसरून १८ ते २० डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घसरण्याची शक्यता जाणवते, असेही श्री खुळे यांनी आपल्या अंदाजात सांगितले आहे.












