Silk agriculture : शेती करताना प्रयोगशील शेतकरी वेगवेगळ्या पिकांचा पर्याय शोधून काढतात. कारण त्यांना चांगला बाजारभाव आणि चांगले उत्पन्न अपेक्षित असते. मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी असाच एक पर्याय शोधला असून सध्या ते त्यातून लाखोंची कमाई करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये असंख्य शेतकरी मागील काही वर्षांपासून रेशीम शेतीकडे वळाले आहेत. लौकीकदृष्ट्या अपारंपरिक मार्गाचे हे पीक याच शेतकऱ्यांना लाखोंची कमाई करून देत आहे. दरम्यान शेतकरी वाढल्याने याच परिसरात रेशीम कोष खरेदीचे केंद्र असल्याची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे जालना येथे रेशीम खरेदी सुरू झाली आहे.
दरम्यान काल दिनांक ५ डिसेंबर रोजी जालना बाजारात रेशीम कोषाला कमीत कमी ४१ हजार तर सरासरी ६८ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तीन दिवसांपूर्वी पांढऱ्या रेशीम कोषांना सरासरी ६० हजार रुपये बाजारभाव मिळत होते, त्यात आता वाढ झाली आहे.