kanda bajarbhav : बिहारसह इतर राज्यांमध्ये जाणारा आणि शेजारील बांग्ला देशात निर्यात होणारा नाशिकचा कांदा सध्या पश्चिम बंगालमध्ये अडकला आहे. कांद्याचे भाव या राज्यात ६० रुपयांपेक्षांही जास्त वर पोहोचले असून त्यावर नियंत्रण राहावे यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. कांदा अडविण्याबरोबरच प. बंगालमधून बाहेर जाणारा बटाटाही या सरकारने अडविला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह बटाट्याची किंमत वाढू शकते.
सध्या नाशिकमधून उन्हाळ कांदा हंगाम जवळपास संपत आला असून अजूनही काही शिल्लक कांदा हॉटेल आणि प्रक्रियासाठी तसेच निर्यातीसाठी पाठवला जात आहे. सध्या सिंगापूर, श्रीलंका, बांग्लादेश यांना हा कांदा रवाना होत असून त्यात उन्हाळी आणि नंतर आलेला पोळ कांदा यांचाही समावेश आहे. पोळ कांदा म्हणजेच लेट खरीप कांदा की ज्याची टिकवण क्षमता खरीपाच्या लाल कांद्यापेक्षा थोडी जास्त असते. सुमारे १५ दिवस टिकणारा हा कांदा प्रवासात खराब होत नसल्याने निर्यातदारांची त्याला पसंती असते.
सध्या पिंपळगाव बाजारात पोळ कांद्याची आवक होत असून त्याचे बाजारभाव ४ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर लाल कांद्याचे भाव या आठवड्यात पुन्हा वधारले असून सुमारे ३८०० रुपये प्रति क्विंटलवर ते स्थिर आहेत. दरम्यान बिहारमध्ये कांदा दर भडकण्याची चिन्हे आहेत. प. बंगाल सरकारने वेळीच अडकवून ठेवलेला कांदा सोडला नाही, तर बिहारमध्ये नाशिकचा कांदा दर वाढू शकतो.
बिहार किंवा बांग्ला देशात जाणाऱ्या कांद्याचे व्यवहार झालेले असतात. त्यामुळे संबंधित व्यापारांनी त्याचे पैसे अदा केलेले असतात, तर उर्वरित रक्कम कांदा पोहोचल्यावर अदा करण्यात येते. मात्र हा कांदा मध्येच थांबल्याने नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांसह संबंधित ठिकाणी त्याचा फटका बसेल. तसेच आगामी काळात व्यापारी हेच नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांकडून वळते करतील आणि त्याचा फटका पुन्हा कांदा दर काही प्रमाणात कमी होऊन शेतकऱ्यांनाच बसेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.












