Kanda Bajarbhav : सध्या काही बाजारात कांद्याचे भाव कमी होताना दिसत आहेत. विशेषत: मागील सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात लासलगाव बाजारात लाल कांद्याला दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी बाजारभाव मिळाला. असे असले तरी हा आठवडा संपताना लासलगाव बाजारात लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल, तर पिंपळगाव बाजारात पोळ कांद्याचे बाजारभाव सरासरी ३८०० रुपये प्रति क्विंटल असे राहिले.
असे असले तरी शेतकऱ्यांना आगामी काळात कांद्याचे भाव पडण्याची चिंता लागली असून शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्या काही तथाकथित लोकांनीच भाव घसरतील अशी अफवा सोशल मीडियावर पसरविण्यास सुरूवात केली आहे. सध्या कांद्यावरील निर्यात शुल्क २० टक्के असून ते पूर्ण कमी केल्यास कांदा उत्पादकांना फायदा होईल अशा पोस्ट सध्या काही तथाकथित शेतकरी नेते सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यातून काहीही कारण नसताना आणि भाव पडलेले नसतानाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून त्याचा फायदा निर्यातदार आणि व्यापारी घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज असल्याचे कांदा बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.
भविष्यात कांदा बाजारभाव पडणार का?
१. कांदा भाव पडणार अशी आवई सध्या काही व्यापारी आणि त्यांची चिल्लीपिल्ली असलेली तथाकथीत बाजारतज्ज्ञ उठवताना दिसत आहेत. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांनी फार लक्ष देऊ नये, असे आवाहन कांदा तज्ज्ञांनी केले आहे.
२. कांदा घसरला अशी महिनाभरापासून आवई उठवली आहे. मात्र अजूनही लाल कांदा ३५००च्या खाली आलेला नाही. डिसेंबरपर्यंत ही स्थिती राहिल, पुढेही भाव खूप खाली येतील याची शक्यता नाही, मात्र खाली येऊन स्थिरावतील अशी शक्यता काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
३. नाफेड आणि एनसीसीएफमध्ये घोटाळेबाजांनी जो काही घोटाळा केलाय, त्यांची केंद्रीय पातळीवर गंभीर दखल घेतली गेली आहे. परिणामी कांदा द्या नाहीतर गुन्हे दाखल करू असा दमच डोकाने दिला आहे. उन्हाळी कांद्यातील खरेदी न केलेला सुमारे ३ लाख मे. टन कांदा परत देणे बाकी आहे. सध्या त्याऐवजी लाल कांदा खरेदी करून ही मंडळी डोकाला (नाफेड-एनसीसीएफला) देत आहेत. त्यामुळे तितकी खरेदी होणार असल्याने त्याचा खड्डा पडून बाजारभावावर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यातून बाजारभाव वाढू शकतात.
४. श्रीलंकेने आयात शुल्क निम्मे केले, तर बांग्लादेशने आयात शुल्क घटवले. त्यामुळे तेथील निर्यात पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. तर अलीकडेच श्रीलंका निर्यात सुरू झालीय. अजूनही दिल्ली आणि उत्तर-पूर्वेकडे कांद्याचे भाव आटोक्यात आलेले नाहीत.
५. राजस्थानमधील अलवर बाजार कांदा अजूनही फार मोठ्या प्रमाणात येत नाही. सोलापूरला येणारा कांदा शेजारच्या कर्नाटकमधून येत आहे, मात्र ती आवक कमी होताना दिसत आहे. त्यामुळे नाशिकचाच कांदा शिल्लक आहे.
एकंदरीत शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता, कमी कालावधीचा कांदा काढून बाजारात आणू नये. असा अपरिपक्व कांदा आणल्यास शेतकऱ्यांचेच नुकसान आहे. त्याऐवजी टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणल्यास बाजारात एकदम कांदा येणार नाही आणि त्यातून शेतकऱ्यांनाच फायदा होईल, असा सल्ला कांदा क्षेत्रातील तज्ज्ञांसह काही जाणत्या कांदा उत्पादकांनी दिला आहे.












