Kanda Bajarbhav : कांदा प्रश्न पोहोचला दिल्ली दरबारी, केंद्र दखल घेणार का?

Kanda Bajarbhav : मागील आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसात आणि या आठवड्याच्या सुरूवातीलाच म्हणचे सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी लासलगाव बाजारासह कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बाजारांत लाल कांद्याचे दर अचानक घसरून २२०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत आले आहेत.

कांदा निर्यातीला सुरूवात झाली असून कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटविण्याची मागणी निर्यातदार आणि कांदा व्यापारी करत आहेत. हे २० टक्के शुल्क हटले, तर कांद्याच्या किमती किमान ४ ते ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच कांद्याचे दर २ हजारांच्या खाली येणार नाहीत. मात्र यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान या संदर्भात कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि निर्यातदारांनी थेट दिल्ली दरबारी कांद्याची व्यथा मांडली आहे. कांदा पट्टयातील दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी काल लोकसभेत बोलताना कांद्याच्या भाव घसरणीचा मुद्दा मांडला. २० टक्के निर्यात शुल्क कमी करावे अशी मागणी त्यांनी केली.

दुसरीकडे काल सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी दिल्लीत कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कांदा निर्यातदारांची बैठक झाली. त्यातही कांदा प्रश्नावर चर्चा होऊन निर्यातशुल्क कमी करण्याची मागणी झाल्याचे समजते. महाराष्ट्राच्या फलोत्पादन निर्यात संघटनेच्या वतीने काल केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कांदा निर्यातशुल्क काढून टाकण्याबाबत निवेदनही देण्यात आले.02:17 PM

 
 

Leave a Reply