Ladaki Bahin : लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळणार…

Ladaki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा रुपये १५०० चा हप्ता खात्यात कधी येणार याची राज्यातील सुमारे १ कोटी लाभार्थी बहिणींना प्रतीक्षा आहे. मात्र आता ही प्रतीक्षा संपल्यात जमा असून लवकरच या महिन्यात हा हप्ता त्यांच्या खात्यात येण्याची आशा निर्माण झाली आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर २४ पर्यंतचा हप्ता आगाऊ देण्यात आला होता. यासह अनेक भगिनींना ७.५ हजार रुपयांचा एकूण लाभ मिळाला होता. त्याचा परिणाम निवडणुकीतील मतदानावर होऊन पुन्हा महायुतीची सत्ता आली आहे.

आधी सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला, त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला. दरम्यान काल दिनांक १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आधीच्या सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या, त्यात लाडकी बहिण योजनेच्या निधीसाठी १४०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासाठी तरतूद आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, कुसुम योजनेतील सौर कृषीपंप, पीक विम्यासाठी तरतूद यांच्यासह समृद्धी महामार्ग, मेट्रो इत्यादी प्रकल्पांच्या अतिरिक्त निधीचा समावेश आहे.

या पुरवण्या मागण्या विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आल्या असून अधिवेशनात त्या मंजूर झाल्या की त्यानंतर प्रत्यक्ष खर्चाची परवानगी मिळून सरकार संबंधित योजनेचा लाभ देऊ शकेल. त्यामुळे लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता बहुतेक या महिन्यातच मिळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply