Dam water discharge : सरकार स्थापना आणि मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता प्रशासकीय पातळीवर रब्बी हंगामासाठी पाण्याच्या आवर्तनाची तयारी सुरू असून विसर्ग कधी होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
विशेषत: ऊस आणि बागायती पट्टयातील शेतकऱ्यांना आता आवर्तनाची प्रतीक्षा असून सरकारी निर्दशाप्रमाणे सर्वच कालवा लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या जवळच्या कार्यालयात मागणीचा अर्ज नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्यस्थितीला राज्यातील धरणांमध्ये एकूण जलसाठा ७९.३४% इतका आहे. मागच्या वर्षी याच काळात तो ६३.३१% इतका होता. तुलनेने पाणी जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तसेच रब्बीसोबत उन्हाळी हंगामातही आवर्तन मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय विविध गावच्या पाणीपुरवठा योजनांनाही यंदा अतिरिक्त पाण्याचा फायदा होणार असून अनेक गावांवर फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान येणारी टँकरची नामुष्की यंदा टळण्याची शक्यता आहे.
यंदा पाऊस चांगला झाल्याने ऊसासह बागायती पिकांचा पेरा वाढला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची आस लागली आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग किंवा आवर्तन कधी सोडणार याची सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे.
जलसंपदा विभागाने आवर्तनाची तयारी केली असून बहुतेक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडले जाईल असे वृत्त अनेक ठिकाणी आलेले आहे. त्याला पुष्टी मिळालेली नसली, तरी लवकरच आवर्तन सोडले जाणार आहे हे नक्कीच.