
आज शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कालच्या तुलनेत टिकून राहिल्याचे दिसून आले. लाल कांदा बाजारभाव किमान २२०० रुपये तर कमाल २८०० रुपये प्रति क्विंटल असे सकाळच्या सत्रात होते. मागील काही दिवसांपासून आवक घटल्याने हे बाजारभाव वाढल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी ॲग्रो तंत्रला सांगितले.
लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की रविवारपासून आवक घटल्याने कांदा बाजारभाव वाढले आहेत. याशिवाय गुजरातमध्ये येणाऱ्या कांदा आवकेत सुमारे दोन ते अडीच लाख टनांची घट झाल्याने राज्यासह देशातही कांद्याचे बाजारभाव वधारले आहेत.
दरम्यान काल दिनांक २७ डिसेंबर रोजी राज्यात कांद्याची एकूण आवक सुमारे १ लाख ६५ हजार क्विंटल झाली. नाशिक जिल्ह्यात सुमारे १ लाख क्विंटल आवक झाली, तर सोलापूरची आवक एकदम घटली असून अवघी ५०० क्विंटल आवक झाल्याचे दिसून येते.
आज सकाळी पुणे जिल्ह्यातील मोशी बाजारात लोकल वाणाच्या कांद्याला १ हजार ते ३५०० रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. एक नंबर कांद्याचे दर बाजारात वधारलेले दिसून आले. दरम्यान काल २७ डिसेंबर रोजी कोल्हापूरात कांदा ४ हजारापर्यंत पोहोचला होता, तर सांगली बाजारात ३७०० रुपयांपर्यंत मजल कांद्याने मारली होती.