Beed murder : बीड खून प्रकरणाविरोधात जरांगे पाटलांची एन्ट्री; प्रत्येक जिल्ह्यात निघणार मोर्चा..

Beed murder :  बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा काही दिवसांपूर्वी खून झाला असून त्यातील अनेक आरोपी अजूनही फरार आहेत. दरम्यान या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून दोन दिवसापूर्वी त्यांनीही खूनाचा संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत आपले संबंध असल्याचे मान्य केले.

मस्साजोग प्रकरणी राज्यभर मोर्चे…
दरम्यान या खूनप्रकरणाची चौकशी व्हावी आणि आरोपींना गजाआड करावे यासाठी बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असला, तरी त्यात सकल मराठा समाजाची भूमिका मोठी आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील राजकारण आणखी तापले आहे. त्यातच मराठा क्रांती मोर्चांचे नेते मनोज जरांगे यांचीही या प्रकरणात एन्ट्री झाली असून त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना थेट इशारा दिला आहे. आम्ही मोर्चा काढत असून सरकार जागे झाले नाही, तर आम्ही त्यांना जागे करू असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर या प्रकरणी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात निषेध मोर्चे काढू असाही इशारा त्यांनी दिला आहे.

खुनातील आरोपींचाही खून..
दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका फोन कॉलच्या आधारे असा दावा केला आहे की बीडच्या देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपींचा खून झाला आहे. त्यांनी संशयाची सुई पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडे वळवली असून मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्यांचा इशारा होता. फरार आरोपींचा खून झाल्याने ते सापडणार नाहीत असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

एकूणच बीड प्रकरणाचे संतप्त वातावरण आता राज्यभर पोहोचणार असून आगामी काळात मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून विरोध वाढू शकतो, अशी चिन्हे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Leave a Reply