Soybean bajarbhav : या बाजारात सोयाबीनला ९ हजार रुपयांचा भाव.

soybean bajarbhav होय, तुम्ही मथळा वाचला तो अगदी बरोबर आहे, त्यात कुठलीही टायपिंगची चूक झालेली नाही. खरंच सोयाबीन ९ हजार रुपये प्रति क्विंटलने विकला गेलाय आणि सरासरी ८७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोयाबीनने मिळवला आहे. पण कुठे अर्थातच ते जाणून घेऊ या.

महाराष्ट्र राज्यात हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू असून शेतकऱ्यांना ४ हजार ८९२ रुपये हमीभाव मिळत आहे. मात्र अनेक खरेदी केंद्रांवर १५ टक्के किंवा जास्त आर्द्रता असेल, तर सोयाबीनला बाजारभाव कमी मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात खरेदी केलेला सोयाबीन वखार महामंडळाच्या गोडाऊन निरीक्षकांनी नाकारल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांना सोयाबीनचे बाजारभाव मिळणे दूरच उलट विकलेला सोयाबीन अंगावर पडतो की काय याची चिंता आहे. याशिवाय हमीभाव खरेदीमध्ये अनेक अडचणी येताना दिसत आहेत.

दुसरीकडे काल शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी लातूर बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनचे सरासरी बाजारभाव ४ हजार १५० रुपये होते. या ठिकाणी १२ हजार १४३ आवक झाली होती. जालना बाजारात पिवळ्या सोयाबीनला काल जास्तीत जास्त ४६५० आणि सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. महाराष्ट्र राज्याचा विचार केला, तर सध्या संपूर्ण राज्यात सोयाबीनचे सरासरी बाजारभाव मागील आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. मात्र हमीभावापेक्षा कमी आहेत. सध्या राज्यात सोयाबीनला सरासरी ४१०० ते ४२०० रुपये बाजारभाव मिळतोय.

याठिकाणी सोयाबीन ९ हजारावर
महाराष्ट्राची ही स्थिती असताना सोयाबीन राज्य म्हणवले जाणाऱ्या मध्यप्रदेशातही सोयाबीनला सरासरी ४२०० ते ४४०० रुपयांचा बाजारभाव मिळताना दिसतोय. काल दिनांक २७ डिसेंबर रोजी उज्जैनच्या बडनगर बाजारात सोयाबीनला चांगला दर मिळाला. याठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव ६ हजार १९१ रुपये पिवळ्या सोयाबीनला मिळाले, तर सरासरी ४४०० रुपयांचा बाजारभाव होता.

आता ज्याची तुम्हाला उत्सुकता लागली आहे, त्या बाजारातील सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तो बाजार आहेत पूर्वेकडील राज्यांत म्हणजेच मणिपूरमध्ये. मणिपूरमधील काकचिंग बाजारात सोयाबीनला जास्तीत जास्त ९ हजार रुपये आणि कमीत कमी ८५०० तर सरासरी ८७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. या ठिकाणी केवळ दोन क्विंटल सोयाबीन आवक झाली. याशिवाय मणिपूर राज्यातील इम्फाळ पूर्वमध्ये असलेल्या लामीलाँग बाजारात सोयाबीनची ४ क्विंटल आवक झाली. याठिकाणीही बाजारभाव ९ हजार रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी ८७०० रुपये प्रति क्विंटल असे होते.

Leave a Reply