
काल दिनांक २७ डिसेंबर रोजी राज्यात नंदुरबार, धुळे, विदर्भातील काही भागासह अनेक ठिकाणी गारपीटीसह पाऊस पडला. आज सकाळी नाशिक जिल्ह्यातही तुरळक पाऊस पडल्याची नोंद आहे.
दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 28 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर किमान तापमानात पुढील दोन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
*कृषी तज्ज्ञांचा पीक सल्ला*
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात 02 जानेवारी 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 03 ते 09 जानेवारी 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आह.
दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.
पूर्व हंगामी ऊस
पूर्व हंगामी ऊसाची लागवड करून सहा ते आठ आठवडे झाले असल्यास 260 किलो युरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे.
ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळदीसाठी काळजी कशी घ्यावी?
हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
उघड्या पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामूळे, उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी. प्रति बंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच अंतराने प्रत्येक महीन्यात जमिनीतून क्लोरोपायरीफॉस 50% 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.
हळदीच्या पानावरील ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत.
हरभरा पिक व्यवस्थापन:
हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.
हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करडई
करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.