
Beed murder case : बीड जिल्हयात झालेल्या खूनाचे राजकारण सध्या चांगलेच रंगले आहे. महायुतीचे घटक असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्यातच आता राजकारण सुरू झाले असून मध्यंतरी भाजपाने जवळ केलेल्या अजित पवार यांना शिंदे गटाने आता चेकमेट देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन तीन आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र अजूनही त्यांच्या हत्याकांडाशी संबंधित काही आरोपी आणि मुख्य सूत्रधार फरार आहे. दुसरीकडे याप्रकरणी राष्ट्रवादी -अजित पवार गटावर आरोपांची नामुष्की ओढवली असून त्याच गटाचे मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात राजीनामा घेण्याबाबत विरोधकांसह, सामाजिक दबाव वाढत आहे.
या सगळ्यात शिवसेना शिंदे गटाने मात्र संयत प्रतिक्रिया देणे पसंत केले असून एकप्रकारे चार हात अंतर ठेवले आहे. असे असले, तरी शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी माध्यमांना मंत्री धनंजय मुंडे यांची गच्छंती होईल असे सूचक विधान करून एक प्रकारे अजित पवार राष्ट्रवादी गटावर मात करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
शिंदेंनी घेतली पीएमची भेट, नक्की कशासाठी?
दरम्यान राज्यात बीड प्रकरणावरून गोंधळ आणि राजकारण तापले असतानाच आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला लक्ष्य केले जात असतानाच अचानक मागच्या गुरूवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुलगा लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होते.
भेटीनंतर श्री. शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत, “ही भेट सदिच्छा भेट होती. तसेच, या भेटीत विकसित भारताच्या वाटचालीत राज्याचा योगदानाबाबत श्री. मोदी यांच्याशी चर्चा केली. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनीही महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. या दौ-या दरम्यान उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
राज्यात शिंदेचे पारडे जड होणार?
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांना ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगितले तरी प्रत्यक्षात महायुतीत आपले स्थान आणि महत्त्व बळकट करण्यासाठीची ही भेट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मध्यंतरी अजित पवार यांच्या गटाने सत्तास्थापनेत बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या गटाला महत्त्वाचे समजले जाणारे अर्थमंत्रीपद देण्यात आले. तसेच शिंदे गटाकडे पूर्वी असणारे कृषी आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खातीही अजित पवार गटाच्या पारड्यात पडली.
त्यामुळे शिंदे गट नाराज होता. दरम्यान त्याच काळात बीडचे मस्साजोग खून प्रकरण घडले आणि विरोधकांसह शिंदे गटालाही आयताच मुद्दा मिळाला. त्यामुळेच योग्य ‘टायमिंग’ साधत एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या वरिष्ठ धुरिणांची भेट घेतल्याचे समजते.
अजित पवार नाही तर शिंदे?
बीड प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठक्ष दबाव आहे. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ आणि संघाचे धुरिणही नाराज आहेत. भविष्यात अजित पवार गटाला महायुतीतून दूर करून त्याजागी शिंदे गटाशी पुन्हा घट्ट सोयरिक जुळविण्याची वेळ आली, तर आपला पक्ष बिनशर्त महायुतीत असेल असा सूचक संदेश शिंदे यांनी भाजपाच्या वरिष्ठांना दिला नाही ना? आणि त्यातून आपले आणि पक्षाचे स्थान बळकट केले नाही ना? अशीही चर्चा सध्या दिल्लीच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे.