
Maharashtra Weather: उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे जम्मू कश्मीरपासून ते मध्यप्रदेशपर्यंत थंडीचा प्रकोप कायम असून संपूर्ण उत्तर भारत थंडीमुळे गारठला आहे. दुसरीकडे या आठड्याच्या सुरूवातीपासून राज्यात अनेक भागात थंडी, धुके आणि ढगाळ वातावरण कायम होते.
कालपासून काही भागात सूर्यनारायणाचे दर्शन होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत ऊबदार वातावरण हळूहळू कमी होत जाऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवार दि. ३ जानेवारी पासून त्यापुढील पाच दिवसासाठी म्हणजे मंगळवार दि. ७ जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
त्यातही विशेषतः उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर आणि व उत्तर विदर्भातील अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात या पाच दिवसात थंडीचा प्रभाव अधिक राहील. मात्र दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.