
kanda lagvad : सध्या नाशिकच्या कांदा पट्ट्यात रब्बी हंगामासाठी कांदा लागवड करताना शेतकरी दिसत आहेत. देवळा, चांदवड, सिन्नर, येवला, कळवण या पट्ट्यात उन्हाळी कांदा लागवड केली जाते. दिवाळीच्या दरम्यान आलेला अवकाळी पाऊस आणि त्यामुळे जमिनीत राहिलेल्या ओलाव्यामुळे यंदा कांदा लागवड उशिरा सुरू आहेत.
कांदा लागवडीसाठी सध्या शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असून ऊसाच्या तोडीचा हंगाम सुरू असल्याने कांदा लागवडीसाठी मजूरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यंत्राच्या साह्याने लागवड करत आहेत. त्यातून त्यांना खर्चही वाढत आहेत.
अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांची कांदा रोपे वाया गेले. त्यामुळे रोपांची टंचाई, रोपांची मर होणे अशा समस्या सध्या शेतकऱ्यांसमोर आहेत. त्यातूनही लागवड लांबत असून जानेवारीतही लागवड सुरू राहणार आहे.
दरम्यान कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील रब्बी कांद्याची लागवड घटली आहे. आतापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार यंदा नाशिक जिल्ह्यात सुमारे ८९ हजार हेक्टर तर उत्तर महाराष्ट्रात सुमारे १ लाख हेक्टर लागवड झाली आहे.
मागील वर्षी हीच लागवड नाशिकमध्ये १ लाख ४२ हजार हेक्टर, तर उत्तर महाराष्ट्रात १ लाख ६७ हजार हेक्टर अशी होती. असे असले तरी यंदा लागवड वाढल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र जानेवारीत वाढेल असा अंदाज कांदा उत्पादकांच्या संघटनेने व्यक्त केला आहे.