मागच्या काही दिवसांपासून कोथिंबीरीची आवक वाढली असून बाजारभाव एकदम घटले आहेत. पुणे बाजारात कोथिंबीरीच्या एका जुडीला कमीत कमी ३ रुपये तर सरासरी ३ ते ५ रुपये बाजारभाव मिळत आहे. नाशिकमध्ये तर कोथिंबीरीला एका किलोला कमीत कमी ९ रुपये तर जास्तीत जास्त १७ रुपयांचा भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत.
दिनांक ८ जानेवारी रोजी पुण्याच्या मांजरी बाजारात कोथिंबीरीच्या सुमारे ४० हजार जुड्यांची आवक होऊन सरासरी ५ रुपयांचा बाजारभाव मिळाला. पुणे बाजार समितीत १ लाख ४२ हजार जुड्यांची आवक होऊन कमीत कमी ३ ते जास्तीत जास्त ५ रुपये बाजारभाव मिळाला. नागपूरला कोथिंबीरील किलोला सरासरी १३ रुपये, तर मुंबईत सरासरी साडेसहा रुपये किलो, कोल्हापूरात सरासरी २० रुपये किलो असे दर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चही निघणे अवघड आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील तिसगाव या चांदवड तालुक्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबीरीचे पडणारे बाजारभाव लक्षात घेता वैतागून आपल्या शेतात उभ्या कोथिंबीरीवर नांगर फिरवला आहे. बाजीराव बागूल असे त्यांचे नाव आहे. त्यांनी सुमारे दीड एकर कोथिंबीर लागवड केली. मजूर लावून त्यांची काढणी केली. वाहतूकीचा खर्च करून कोथिंबीर बाजारात नेल्यावर मात्र भाव पडलेले दिसले. विशेष म्हणजे हा खर्च त्यांनी उसनवार करून केला होता.
सध्या अनेक शेतकऱ्यांची हीच अवस्था असून बाजार पडल्याने आणि खर्च वाढल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.












