Tur bajarbhav : तुरीच्या भावाला येणार तरतरी; मार्चपर्यंत असे असतील भाव..

Tur bajarbhav : सध्या लातूर बाजारात लाल तुरीला सरासरी साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल, तर पांढऱ्या तुरीलाही साधारण तितकेच बाजारभाव मिळत आहेत. शेतकऱ्यांना तूरीचे बाजारभाव वाढतील का याची प्रतिक्षा आहे. दरम्यान जानेवारी ते मार्चपर्यंतच्या काळात तुरीचे संभाव्य बाजारभाव कसे असतील ते जाणून घेऊ या.

भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश आहे. भारतातील तूर उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा वाटा ६० टक्के पेक्षा जास्त आहे. तूरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. केंद्र शासनाने तूर निर्यातीसाठी खुली केली असून तूरीचा आयात कोटा मर्यादित ठेवलेला आहे.

माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष डिसेंबर (१६ डिसेंबर २०२४) मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेली दिसून येत आहे. डिसेंबर २०२४ मध्ये २.९ लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ५.४ लाख टन होती.

तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३५.०२ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन ८.६ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये १०.१ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

डिसेंबर २०२२ पासून तुरीच्या किंमती वाढत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव कमी आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या जानेवारी ते मार्च मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणेः

जानेवारी ते मार्च २०२२: रु. ६.३१०/क्विंटल
जानेवारी ते मार्च २०२३: रु. ७,७३५/क्विंटल
जानेवारी ते मार्च २०२४: रु.८.९६६/क्विंटल

सध्याच्या हंगामासाठी सरकारने खरीप २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (रु. ७५५०/क्विंटल) सध्याच्या तुरीच्या हमीभावाच्या जवळपास आहेत. मागील वर्षाच्या म्हणजेच २२-२३च्या तुलनेत २३-२४ मध्ये आयात कमी झालेली आहे, तर निर्यात वाढलेली आहे.

अशा असतील मार्चपर्यंत संभाव्य किंमती
दरम्यान कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार चांगल्या दर्जाच्या तुरीसाठी जानेवारी ते मार्च २५ दरम्यान ८ हजार ते १० हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव राहतील असा अंदाज आहे.

Leave a Reply