
President’s invitation : सेंद्रिय शेती आणि जैविक शेतीत विविध प्रयोग करून शेती संपन्न करणाऱ्या आणि स्वत:बरोबर इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करणाऱ्या नांदेड येथील लोहा तालुक्यातील तरुण शेतकरी रत्नाकर ढगे यांना प्रजासत्तादिनी दस्तूरखुद्द भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांनी राष्ट्रपतीभवनात आमंत्रित केले आहे. त्यामुळे सध्या त्यांचे सर्व पातळीवर कौतुक होत आहे.
या शेतकऱ्यांतील नांदेडच्या लोहा तालुक्यातील मौजे सायळा येथील शेतकरी श्री रत्नाकर गंगाधरराव ढगे हे प्रयोगशील शेतकरी आहेत. सेंद्रीय व नैसर्गीक पद्धतीने ते शेती करतात. याशिवाय विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन माहितीही मिळवतात. नियमितपणे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवितात. तसेच त्यांनी सेंद्रिय शेती प्रकल्पाद्वारे २०२२-२३ मध्ये आयोजीत तीन दिवसाच्या व २०२३-२४ मध्ये आयोजित पाच दिवसाच्या प्रशिक्षणातून तसेच जैव उर्जेवर आधारीत एक दिवसीय कार्यशाळेतून सेंद्रिय शेतीच विशेष प्रशिक्षण घेतले. त्याप्रमाणे सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली.
त्यांना मिळालेले ज्ञान त्यांनी स्वत:पुरतेच ठेवले नाही तर इतर शेतकयांना देऊन विद्यापीठाच्या विस्तार कार्यात सहभाग नोंदविला. ते शेतीमध्ये आणि शेतकयासाठी विविध नाविन्य पूर्ण कार्यक्रम राबवितात. यांची दखल घेऊन त्यांना दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मूर्मू यांचेतर्फे विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी केलेले जैव ऊर्जा आणि सेंद्रीय शेती या क्षेत्रातील कार्य आणि योगदानामुळे त्यांचा हा विशेष सन्मान होत आहे.
दरम्यान वसंतराव नाईक परभणी कृषी विज्ञापीठाच्या वतीने नुकताच श्री. ढगे यांचा सत्कार करण्यात आला.