
सध्या सोयाबीनचे बाजारभाव या आठवड्यात ४ हजार ते ४१०० रुपये सरासरी असे टिकून राहिले आहेत. मात्र राज्यातील अनेक ठिकाणी सोयाबीनचे सरासरी बाजारभाव ४ हजाराच्याही खाली गेलेले पाहायला मिळत आहेत.
शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची १८ हजार १३१ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजार भाव ३९०० रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव ४३१३, तर सरासरी बाजारभाव ४१७० रुपये प्रति क्विंटल मिळाले. लातूर बाजारात सोयाबीनचे बाजारभाव या आठवड्यात टिकून राहिल्याचे दिसून येत आहे.
यंदा हमीभाव खरेदी करण्यासाठीची मुदत लवकरच संपुष्टात येणार आहे. संक्रांतीनंतर हमीभाव खरेदी थांबली, तर त्याचा परिणाम बाजारावर होऊ शकतो. दुसरीकडे हमीभाव खरेदीची मुदत वाढूनही त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नाहीये. कारण सध्या बारदानाच्या कमतरतेमुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांनी त्यांची खरेदी थांबवली आहे. याशिवाय अनेक अटी शर्तींचा जाचही शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे, तर अनेकांनी नाईलाजाने सोयाबीन बाजारात कमी भावात विक्रीला काढले आहे.
या ठिकाणी जास्त बाजारभाव…
दरम्यान शुक्रवारी अमरावती बाजारात साडेनऊ हजार क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आहे. कमीत कमी बाजारभाव ३९०० रुपये आणि सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला. कारंजा बाजारात ७ हजार क्विंटल सोयाबीन आवक होऊन सरासरी ४ हजाराचा बाजारभाव मिळाला. रिसोड बाजारात ३९७५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
वाशिम बाजारात पिवळ्या सोयाबीनची ३ हजार क्विंटल आवक झाली. याठिकाणी कमीत कमी ३८५० रुपये, जास्तीत जास्त ४९०० रुपये बाजारभाव मिळाला. राज्यातील कालचा हा सर्वाधिक कमाल बाजारभाव होता. या ठिकाणी सरासरी ४३०० रुपये बाजारभाव मिळाला, तोही सर्वाधिक होता.